प्रेमी युगुलांना भेटण्यासाठी मेट्रो शहरांमध्ये जागा नसल्याच्या तक्रारी अनेकदा होताना दिसतात. त्यामुळे ही प्रेमी युगुले एकमेकांना भेटण्यासाठी जागा शोधत असतात. दिल्लीतील आयटीओ येथील स्कायवॉकच्या निर्मितीमुळे युगुलांना नुकतीच भेटण्यासाठी एक चांगली जागा मिळाली होती. मात्र आता त्याठिकाणी बाऊन्सरची नियुक्ती करण्यात आल्याने युगुलांना त्याठिकाणीही एकमेकांना भेटता येणार नाही. नुकतेच दिल्लीत एका स्कायवॉकचे उद्घाटन झाले. अगदी कमी वेळात ही जागा प्रेमी युगुलांसाठी हँगआऊट स्पॉट झाली. मात्र काही वेळातच त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी सुरक्षा रक्षकही नेमण्यात आले. मात्र त्यांचे कोणीही ऐकत नसल्याने आता स्कायवॉक तयार करणाऱ्या कंपनीने याठिकाणी थेट बाऊन्सरचीच नियुक्ती केली आहे.

एकूण ६ बाऊन्सर आणि १५ गार्डची या स्कायवॉकवर नियुक्ती करण्यात आली आहे. या बाऊन्सरला काळ्या रंगाचा वेगळा ड्रेस देण्यात आला आहे. सामान्य सुरक्षारक्षकांचे लोक ऐकत नसल्याने आमची नियुक्ती करण्यात आल्याचे येथील एका बाऊन्सरने सांगितले. तर मला दिवसाला किमान १०० जोडप्यांना याठिकाणहून हाकलावे लागते असे दुसरा म्हणाला. हा स्कायवॉक पादचाऱ्यांना जाण्यायेण्यासाठी असून युगुलांसाठी नाही यासाठी लक्ष ठेवावे लागते असे या बाऊन्सर्सनी सांगितले. हे बाऊन्सरची सकाळी ८ ते रात्री ८ या वेळात काम करतात. स्वदेशी सिव्हील इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीने या बाऊन्सर्सची नियुक्ती केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला याबाबत विचारले असता आम्हाला याची माहिती नसल्याचे अभियंते उमेश मिश्रा यांनी सांगितले.

याआधी अशाप्रकारे एखाद्या स्कायवॉकवर बाऊन्सर कोणीच पाहिले नसतील. मात्र आता याठिकाणची ती गरज असल्याने आम्ही हे काम करत आहोत असे एका बाऊन्सरने सांगितले. त्यामुळे आता प्रेमी युगुलांना भेटण्यासाठी स्कायवॉक ही जागा बंद झाली असून केवळ पादचाऱ्यांनाच याठिकाणी प्रवेश मिळणार आहे. अशाप्रकारे प्रेमी युगुलांसाठी नजर ठेवण्यासाठी स्कायवॉकवर बाऊन्सरची नेमणूक करण्याची ही पहिलीच वेळ आहे.