काश्मीरमधील परिस्थितीवरून भारताला शहाणपणाचे धडे शिकवणाऱ्या आणि मानवी हक्कांच्या नावाखाली आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताला लक्ष्य करणाऱ्या पाकिस्तान तोंडघशी पडण्याची वेळ ओढवली आहे. पाकिस्तानचा सर्वात मोठा प्रांत असलेल्या बलुचिस्तानमध्ये थेट पाकिस्तानविरोधी घोषणा देण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. पाकिस्तानकडून आमच्या भागात अत्याचार सुरु असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. याशिवाय पाकव्याप्त काश्मीरमध्येही पाकिस्तानविरोधात आगपाखड करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून संयुक्त राष्ट्रसंघात मानवी हक्क संरक्षणाच्या नावाखाली काश्मीरमधील फुटीरतावाद्यांती तळी उचलून धरणाऱ्या पाकिस्तानला घरचा आहेर मिळाला आहे.
पाकव्याप्त काश्मीरही भारताचेच, मोदींची गर्जना
जम्मू-काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग असल्याचे ठणकावून सांगितले होते. हिज्बुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुरहान वाणी मारला गेल्यानंतर काश्मीरमध्ये हिंसाचाराचे वातावरण आहे.
काश्मीरमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानमध्ये १९ जुलैला काळा दिवस साजरा करण्यात आला होता. काश्मीरवासियांच्या स्वतंत्र लढाईसाठी पाकिस्तान राजकीय आणि नैतिकतेतून समर्थन करेल, असे आश्वासन पाकिस्तान पंतप्रधान नवाज शरीफ यांनी दिले होते.