करोना विषाणूचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने १७ मे पर्यंत लॉकडाउनचा कालावधी वाढवला आहे. या काळात संपूर्ण देशात सार्वजिनक वाहतूक सुविधा बंद ठेवण्यात आली आहे. भविष्यकाळात केंद्र सरकार अटी व शर्थींसह सार्वजिनक वाहतूक सुविधा सुरु करण्याच्या विचारात असल्याचं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं. सार्वजनिक वाहतूक आणि महामार्ग खुले केल्यानंतर लोकांमध्ये आत्मविश्वास येईल असा अंदाज आहे. पण यासाठीही आधी नियमावली आखून देण्यात येईल. नितीन गडकरी Bus and Car Operators Confederation of India च्या सदस्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलत होते.

काही दिवसांपूर्वी इतर राज्यांमध्ये अडकलेल्या परप्रांतीय कामगारांना बाहेर काढण्यासाठी रेल्वे विभागाने विशेष रेल्वे गाड्या चालवत आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये बोलत असताना गडकरी यांनी या लढाईत आपण सर्वांनी एकत्र येऊन लढल्यास नक्की यशस्वी होऊ असा आत्मविश्वास व्यक्त केला. सध्या लॉकडाउन काळात सर्व राज्यांच्या सीमा बंद असून फक्त सर्व वाहतूक व्यवस्था बंद करण्यात आली आहे. सर्व राज्य इतर राज्यात अडकलेल्या आपल्या नागरिकांना घरी आणण्यासाठी विशेष बस गाड्या चालवत आहे.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरु केल्यास करोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, पंजाब सरकारनं ८० ट्रॅव्हल्सच्या मदतीनं ४ हजार नागरिकांना परत राज्यात नेले. त्याठिकाणी या यात्रेकरूंची तपासणी करण्यात आली. त्यात तब्बल ७९५ जणांचे अहवाल करोना पॉझिटिव्ह आले आहेत. २८ एप्रिल रोजी पंजाबमधील करोनाग्रस्त रुग्णांची संख्या ५१० पर्यंत होती. मात्र, अचानक आठशे रुग्ण वाढल्यानं पंजाबमधील रुग्णांची १२३२ वर पोहोचली आहे.