निर्मला सीतारामन यांचे स्पष्टीकरण
डाळींच्या साठय़ावर र्निबध लागू करून भारताने व्यापार नियमांना फाटा दिलेला नाही, असे आज स्पष्ट करण्यात आले. डाळींचे भाव गगनाला भिडल्यानंतर किरकोळ विक्री समूह, आयातदार व इतरांवर साठा करण्याचे र्निबध लागू करण्यात आले होते. काळा बाजार व साठेबाजीला आळा घालणे, हा त्यामागचा हेतू होता. हा मुद्दा अमेरिकेच्या बाजूने भारत-अमेरिका व्यापार धोरण मंचाच्या बैठकीत उपस्थित करण्यात आला होता. अमेरिकेतील काही गट व प्रतिनिधींनी असा आरोप केला होता की, भारताने डाळीची आयात बंद करण्यासाठी साठा मर्यादा ३५० मेट्रिक टन इतकी केली.
व्यापार मंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, हे व्यापार र्निबध नाहीत, केवळ डाळींचे भाव कमी करण्यासाठी केलेले उपाय आहेत, परिस्थितीमुळे तसा निर्णय घ्यावा लागला. भारतात डाळींचे उत्पादन जास्त होत नाही पण मागणी मात्र जास्त आहे. त्यामुळे अमेरिका व कॅनडातून डाळ आयात करण्यात येते. डाळींचे अपेक्षित उत्पादन न झाल्याने जूनपासून डाळीची टंचाई होती, भारताने त्यासाठी जागतिक निविदा काढल्या तेव्हा जागतिक बाजारातही डाळीची फार उपलब्धता नव्हती. डाळींची आयात चालू आहे पण ही आयात डाळ बाजारात उपलब्ध केली जात नाही, असे लक्षात आल्यानंतर आम्ही साठेबाजीला मर्यादा घातल्या.