पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यात आपल्या देशाचे चाळीस जवान शहीद झाले. १४ फेब्रुवारीला जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने हा भ्याड हल्ला केला. देशासाठी हौतात्म्य पत्करलेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी व्यापाऱ्यांनी आज देशव्यापी बंदची घोषणा केली आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्ये या बंदमध्ये सहभागी झाली असल्याची माहिती अखिल भारतीय व्यापारी महासंघाने दिली. या बंद दरम्यान देशभरातील किरकोळ व्यापाऱ्यांचा आज देशव्यापी बंद असेल, तसेच घाऊक बाजारपेठा बंद रहातील असे व्यापारी महासंघाने स्पष्ट केले आहे.

व्यापारी महासंघातर्फे विविध ठिकाणी श्रद्धांजली सभाही आयोजित करण्यात आल्या आहेत. या सभेच्या आधी पाकिस्तान आणि चीन या दोन देशांमधील वस्तूंचं प्रतिकात्मक दहनही करण्यात येणार आहे. इतकंच नाही तर हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांसाठी आर्थिक मदत गोळा करून ती त्यांना पाठवण्यात येईल असेही महासंघाचे महासचिव प्रवीण खंडेलवाल यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना स्पष्ट केले.

१४ फेब्रुवारीला झालेल्या भ्याड हल्ल्यात देशाच्या चाळीस जवानांना त्यांचे प्राण गमवावे लागले. या भ्याड हल्ल्यााच निषेध नोंदवत व्यापारी महासंघाने देशव्यापी बंद पुकारला आहे. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, राजस्थान, तामिळनाडू, पंजाब, हरयाणा, जम्मू आणि काश्मीर ही सगळी राज्ये हे बंदमध्ये सहभागी आहेत. हा बंद शांत पद्धतीने पाळण्यात येणार आहे. तसेच यावेळी जो काही निधी देशभरातून गोळा होईल तो शहीद जवानांच्या कुटुंबीयांना पाठवण्यात येणार आहे.