अनु राणी, वयवर्ष २८…पंजाबच्या होशियारपूरमध्ये राहणाऱ्या या महिलेने नवऱ्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर घरकामं करायला सुरुवात केली. मात्र पंजाब सरकारच्या उद्योग मंत्रालयाने सुरु केलेल्या ई-रिक्षा प्रकल्पामुळे अनु राणी आता रिक्षा चालवण्याचं काम करुन आपल्या मुलांची काळजी घेते आहे. पंजाब सरकारचे उद्योगमंत्री सुंदर शाम अरोरा यांनी आपल्या होशियारपूरमध्ये गरजू महिलांसाठी ई-रिक्षाचा प्रकल्प राबवला आहे. अल्पावधीतच याला स्थानिक महिलांनी चांगला प्रतिसाद दिला असून सध्या ३८ महिला रिक्षा चालवत आपलं घर सांभाळत आहेत. पंजाब सरकारने या प्रकल्पासाठी ५० लाखांचा निधी देत या महिलांना रिक्षा दिल्या आहेत. सर्व महिलांना सरकारतर्फे रिक्षा चालवण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं. यानंतर लायसन्स घेऊन या महिला दिवसाला ६०० ते ८०० रुपयांची कमाई करतात.

“घरकाम करत मुलांचा सांभाळ करणारी अनु राणी आणि रिक्षा चालवत घर सांभाळणारी अनु राणी यात खूप फरक आहे. रिक्षा चालवण्याच्या कामात मला स्वातंत्र्य आहे…मला जेव्हा वाटतं त्यावेळी मी मुलांसोबत वेळ घालवू शकते. घरकाम करत असताना मला मुलांसोबत फारसा वेळ घालवता येत नव्हता. या रिक्षामुळे मला पंख मिळालेत असं वाटतंय. मुलांची आणि घरातली सर्व कामं केल्यानंतर मी रिक्षा चालवण्यासाठी बाहेर पडते.” अनु राणीने इंडियन एक्सप्रेसशी बोलताना माहिती दिली. भारतात रिक्षा चालवण्यात पुरुष आघाडीवर आहेत. गेल्या काही वर्षांत मोठ्या शहरांसह गावखेड्यातही महिला रिक्षा चालवत आहेत. आपण रिक्षा चालवत असताना अनेक जणं पाठीमागे वळून आपल्याकडे पाहतात. महिला वर्ग माझ्या रिक्षात अगदी निर्धास्त होऊन बसतो, त्यांना माझ्या ड्रायव्हिंगवर विश्वास बसल्याचं अनु राणीने सांगितलं.

या प्रकल्पासाठी पंजाब सरकारने गरजू महिलांकडून अर्ज मागवले होते. ५० अर्जांपैकी निवड ३८ महिलांची निवड करुन त्यांना रिक्षा चालवण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं. या प्रकल्पाला यश मिळाल्यानंतर सर्व राज्यात हा चर्चेचा विषय बनल्याचं, पंजाबचे उद्योगमंत्री सुंदर शाम अरोरा यांनी सांगितलं. सोशल मीडियावरही या प्रकल्पाची चर्चा असल्याचं अरोरा म्हणाले. मतदारसंघात नागरिकांच्या समस्या ऐकायला जात असताना अनेक महिलांनी अरोरा यांच्याकडे रोजगारासाठी काही सुविधा करण्याची मागणी केली होती. अनेक महिलांच्या रोजगाराचा आणि पोटापाण्याचा प्रश्न होता. मी स्वतः चार मुलींचा बाप असल्यामुळे मला या महिलांना मदत करायची होती. यावेळी विचार करत असताना मला ई-रिक्षाची संकल्पना सुचल्याचं अरोरा म्हणाले.

प्रत्येक रिक्षात स्थानिक प्रशासनाने GPS Monitoring System लावून पोलीस यंत्रणेला त्यांना मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच या रिक्षांना चार्जिंग मिळावं यासाठी होशियारपूरमध्ये विविध ठिकाणी सेंटर्स उभारण्यात आली आहेत. आता अनेक लग्न झालेल्या महिलाही आपल्या घराला हातभार लावण्यासाठी रिक्षा चालवत असल्याचं अरोरा यांनी सांगितलं.