देशभरात करोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये लॉक़डाउन लावण्यात आला आहे. पंजाबमध्येही आता लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. पुढील सूचनेपर्यंत हा लॉकडाउन लागू राहील अशी माहिती पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. रोज संध्याकाळी ६ ते पहाटे ५ पर्यंत हा लॉकडाऊन असणार आहे. तर शुक्रवार ते सोमवार विकेंड लॉकडाउनही लागू करण्यात आला आहे. नागरिकांना घरातच राहण्याचं आणि अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर न पडण्याचं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केली आहे. पुढील सूचनेपर्यंत हा लॉकडाउन लागू राहणार आहे.

देशातल्या इतरही राज्यांमध्ये लॉकडाउन लावण्यात आला आहे.
२२ एप्रिलपासून १ मेपर्यंत महाराष्ट्रात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत.हे सर्व नियम २२ एप्रिल रोजी संध्याकाळी ८ वाजेपासून १ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत लागू असतील. आता कर्नाटक सरकारनेही लॉकडाउन लावण्याचा निर्णय घेतला आहे. उद्यापासून (२७ एप्रिल) १४ दिवसांचा लॉकडाउन राज्यात असणार आहे. उद्या रात्रीपासून निर्बंध लागू होणार आहेत.

अत्यावश्यक सेवांना या लॉकडाउनमधून सूट देण्यात आली आहे. दुकानं सकाळी ६ ते सकाळी १० पर्यंत अर्थात ४ तास सुरु असतील. त्यानंतर दुकानं बंद असतील असं जाहीर करण्यात आलं आहे. त्या व्यतिरिक्त इतर सेवा पूर्णपणे बंद असतील असं सांगण्यात आलं आहे. तर बांधकाम, शेती आणि उत्पादन क्षेत्राला परवानगी असणार आहे. सार्वजनिक वाहतूक बंद असणार आहे. त्याचबरोबर राज्य आणि राज्याबाहेर यात्रा करण्याची परवानगी नसेल. अत्यावश्यक प्रकरणात सूट दिली जाईल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. त्याचबरोबर दारुच्या होम डिलिव्हरीलाही मंजुरी देण्यात आली आहे.

तर संपूर्ण जम्मू काश्मीरमध्ये परवा रात्री ८ ते आज सकाळी ६ वाजेपर्यंत कर्फ्यू लावण्यात आला होता. करोना कर्फ्यू दरम्यान अत्यावश्यक सेवांना सूट देण्यात आली होती. याव्यतिरिक्त सर्व बंद होतं.