काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी कोरोना व्हायरसच्या मुद्यावरून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. तुमच्या सोशल मीडिया अकाउंटवर विदुषकी खेळ खेळून भारताचा वेळ वाया घालवणं बंद करा, असं राहुल गांधी यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे. शिवाय, चीनच्या पंतप्रधान कार्यालयाकडून जारी करण्यात आलेला एक व्हिडिओ देखील त्यांनी ट्विटबरोबर जोडला आहे.

“भारत आपत्कालीन परिस्थितीला सामोरं जात असताना, तुमच्या सोशल मीडिया अकाउंटवर विदुषकी खेळ खेळून भारताचा वेळ वाया घालवणं बंद करा. कोरोना व्हायरसचे आव्हान स्वीकाराताना प्रत्येक भारतीयावर लक्ष केंद्रीत करा” असं राहुल गांधींनी ट्विट केलं आहे.

प्रत्येक राष्ट्राच्या आयुष्यात असे काही क्षण असतात जेव्हा त्यांच्या नेत्यांची कसोटी लागते. एका खऱ्या नेत्याचं संपूर्ण लक्ष हे येऊ घातलेलं मोठं संकट टाळण्यावर असतं. कोरोना व्हायरसचा परिणाम भारत व भारतीय अर्थव्यवस्थेवर देखील होवू शकतो. कोरोना व्हायरसचा आपल्या जनतेला व अर्थव्यवस्थेला अत्यंत गंभीर धोका आहे. मला वाटतं सरकार याकडे गांभिर्याने लक्ष देत नाही. यावर वेळीच उपाययोजना केल्या नाहीतर धोकादायक ठरू शकतं.” असंही  राहुल गांधी ट्विटद्वारे म्हणाले आहेत.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना व्हायरसमुळे घाबरुन जाऊ नये असं आवाहन केलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव भारतात पसरु नये यासाठी सरकार आवश्यक ते प्रयत्न करत आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे.

या अगोदर  राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना सोशल मीडिया नका सोडू असा सल्ला दिला होता.  पंतप्रधान नरेंद्र मोदी तुम्ही सोशल मीडिया सोडू नका पण द्वेष करणं सोडा असा सल्ला देणारं एक ट्विट काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलं होतं.

तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मीडिया सोडणार नाहीत, हे आज स्पष्ट झालं. कारण त्यांनी केलेलं एक नवं ट्विट समोर आलं आहे. सोमवारी रात्री उशिरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक ट्विट केलं होतं. त्यामध्ये सोशल मीडिया सोडण्याचा विचार करतो आहे असं त्यांनी म्हटलं होतं. ते असं का म्हणाले त्याचं कारण आता समोर आलं आहे.

#SheInspiresUs असा हॅशटॅग मोदींनी ट्विट केला आहे. ८ मार्च म्हणजेच रविवारी महिला दिनाच्या दिवशी आपली सगळी सोशल मीडिया अकाऊंट्स महिलांना हँडल करायला देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोशल मीडिया सोडणार नाहीत हे स्पष्ट झालं आहे.