राफेल करार प्रकरण दिवसेंदिवस तापतच चालले आहे. फ्रान्सचे माजी राष्ट्रपती फ्रन्स्वा ओलांद यांनी या करारात भारतानेच रिलायन्सचे नाव सुचवल्याचे नुकतेच एका मुलाखतीत सांगितले. त्यानंतर पुन्हा एकदा मोदी सरकार अडचणीत सापडले आहे. त्यावरुन काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच संरक्षण मंत्री निर्मला सितारामन यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यानंतर गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी प्रतिक्रिया दिली असून या प्रकरणी होत असलेले सर्व आरोप निराधार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.


राजनाथ सिंह म्हणाले, राफेल प्रकरणावरुन वाद निर्माण करण्यामध्ये काहीही अर्थ नाही. ओलांद यांच्या गौप्यस्फोटावर बोलताना राजनाथ म्हणाले, संरक्षण मंत्रालयाने यापूर्वीच ओलांद यांनी हा करार तपासला असल्याचे अधिकृतरित्या एका निवेदनाद्वारे सांगितले आहे. त्यामुळे या प्रकरणी सातत्याने होत असलेले आरोप हे निराधार असून त्यातून काहीही निष्पण्ण होणार नाही.

दरम्यान, राफेल लढाऊ विमानांच्या खरेदी व्यवहारात भारतीय कंपनीची निवड करण्यामध्ये आमची कोणतीही भूमिका नव्हती. करारासाठी कुठल्या भारतीय कंपनीला भागीदार म्हणून निवडायचे त्याचे पूर्ण स्वातंत्र्य फ्रेंच कंपनीला आहे असे फ्रान्स सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. राफेल डीलसंबंधी फ्रान्सचे माजी राष्ट्रपती फ्रान्स्वा ओलांद यांनी केलेल्या नव्या गौप्यस्फोटामुळे मोदी सरकार कोंडीत सापडलेले असताना फ्रान्स सरकारने या करारातील त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

यानंतर काँग्रेसचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, या प्रकरणी जबाबदार असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा ते आता या पदावर बसण्यास लायक नाहीत. मंत्रीमंडळातील एकाला पंतप्रधान करा, अशी माझी वैयक्तिक मागणी आहे.