भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्या खांद्यावर आता आणखी एक महत्वाची जबाबदारी येण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (IMF) व्यवस्थापकीय संचालकपदी त्यांची नियुक्त होऊ शकते. या पदाच्या शर्यतीत ते आघाडीवर आहेत.

ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्रालयाने मागणी केली आहे की, या पदासाठी यावेळी सक्षम अशा एखाद्या भारतीय व्यक्तीचे नाव सुचवले जावे. त्यामुळे यासाठी अव्वल अर्थतज्ज्ञ असलेले तसेच जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाच्या शिखर बँकेचे अर्थात भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नरपद सांभाळलेल्या राजन यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, रघुराम राजन यांनी बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदासाठी नकार दिला होता. त्यांनी बीबीसीसोबत चर्चेमध्ये सांगितले होते की, ब्रिटनची केंद्रीय बँक ही बहुतांश देशाच्या राजकारणाशी जोडली गेलेली आहे आणि ब्रिटनच्या राजकारणाची आपल्याला काहीच माहिती नाही, त्यामुळे आपण गव्हर्नरपदाची जबाबदारी योग्य प्रकारे सांभाळू शकणार नाही, असे त्यांनी म्हटले होते.

IMFच्या प्रमुख क्रिस्टीन लेगार्ड यांनी गेल्या आठवड्यात आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. लेगार्ड यांनी म्हटले होते की, त्यांचा राजीनामा १२ सप्टेंबरपासून लागू होईल. जुलै २०११ मध्ये लेगार्ड या IMFच्या प्रमुख बनल्या होत्या. सध्या IMFने अमेरिकेचे अर्थतज्ज्ञ डेव्हिड लिप्टन यांना हंगामी प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. दरम्यान, IMFच्या कार्यकारी संचालक मंडळाने लेगार्ड यांचा राजीनामा स्विकारला असून या संस्थेसाठी त्यांनी केलेले काम आणि दिलेल्या योगदानाचे त्यांनी कौतुकही केले आहे.