कर्नाटक विधानसभा निवडणुकांमध्ये भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड आणि फेसबुक महत्त्वाची भूमिका बजावताना दिसणार आहेत. कारण द्रविड कर्नाटक विधनासभा निवडणुकांसाठी ब्रॅंड अॅम्बेसेडर असणार आहे. तर निवडणूक आयोगाचा सोशल मीडिया पार्टनर म्हणून फेसबुक कायम राहणार असल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त ओपी रावत यांनी स्पष्ट केलं आहे.

कर्नाटक राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी संजीव कुमार यांनी राहुल द्रविडला कर्नाटक विधनासभा निवडणुकांसाठी ब्रॅंड अॅम्बेसेडर करत असल्याची घोषणा केली आहे. दुसरीकडे फेसबुकबाबत बोलताना , फेसबुक आमचा सोशल मीडिया पार्टनर म्हणून कायम असेल असं ओ पी रावत म्हणाले. काही चुकांमुळे सोशल मीडियाचा वापर थांबवता येणार नाही, बॅंकेत घोटाळा झाला म्हणून आपण बॅंकिंग थांबवली नाही असं रावत म्हणाले. परवानगीशिवाय डेटा चोरी करण्याचा मुद्दा तपासला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं.

कर्नाटकमध्ये 12 मे रोजी मतदान होणार असून 15 मे रोजी मतमोजणी होणार आहे. येथे 224 जागांसाठी एकाच टप्प्यात निवडणूक होणार असून आचारसंहिता लागू झाल्याची घोषणाही आयोगाने केली आहे. कर्नाटकात सध्या 122 आमदारांसह काँग्रेस सत्तेत आहे. या निवडणुकीचे पडसाद राष्ट्रीय राजकारणावर उमटणार आहेत.