आरक्षण मिळाले तरी नोकर्‍या आहेत कुठे? सरकारी नोकर्‍या नाहीत असं वक्तव्य केल्याने केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी अडचणीत आले असून त्यांच्यावर टीका सुरु झाली आहे. दरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नितीन गडकरी यांचं अभिनंदन करत टोला मारला आहे. उत्कृष्ट प्रश्न विचारलात असं ट्विट करत राहुल गांधींनी गडकरींवर टीका केली आहे.

नितीन गडकरी यांनी आरक्षण नोकरी देईल याची शाश्वती नाही कारण नोकऱ्या कमी होत चालल्या असल्याचं म्हटलं होतं. ‘समजा आरक्षण दिलं, तरी नोकऱ्या आहेत कुठे ? बँकेत आयटी तंत्रज्ञानाचा वापर वाढला असल्याने नोकऱ्या नाही आहेत. सरकारी नोकरभरती बंद आहे. नोकऱ्या आहेतच कुठे ?’ असं नितीन गडकरींनी म्हटलं होतं.

त्यांच्या याच वक्तव्याचा आधार घेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ‘उत्कृष्ट प्रश्न विचारलात गडकरीजी. प्रत्येक भारतीय हाच प्रश्न विचारत आहे’, असं ट्विट करत त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला.

दुसरीकडे काँग्रेस पक्षाने ट्विटरच्या माध्यमातून नितीन गडकरींना सत्य बोलणारे पहिले भाजपा मंत्री झाल्याबद्दल अभिनंदन केलं आहे.

आरक्षणाच्या संदर्भात येणाऱ्या मागण्या नैराश्यातून पुढे आलेल्या आहेत. वाढती बेरोजगारी, शेतीमालाला न मिळणारा भाव यातून आरक्षणाची मागणी पुढे येत आहे.आरक्षणासाठी सर्व राजकीय पक्षांचे विचार जाणून घेऊन पावले उचलली जातील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कामी लक्ष घालत आहेत, अशी पाठराखण करत केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी आरक्षण आंदोलनात आगीत तेल ओतण्याचे काम कोणी करू नये, असे सांगितले.

सोबतच शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक मागासलेपणाबाबत सर्वांनी विचार करून तोडगा काढला पाहिजे,’ असे आवाहन यावेळी त्यांनी केले.