गुजरात विधानसभा निवडणुकांचा पहिला टप्पा पार पडला. आता दुसऱ्या टप्प्याचे मतदान १४ डिसेंबरला होणार आहे. काँग्रेस विरूद्ध भाजप असा सामना रंगताना दिसतो आहे. अर्थातच ही लढत नरेंद्र मोदी विरूद्ध राहुल गांधी अशीच आहे. सोमवरी राहुल गांधी यांनी त्यांच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कडाडून टीका केली. ज्या प्रमाणे एखादा सिनेमा फ्लॉप होतो त्याचप्रमाणे भाजपची विकासयात्रा फ्लॉप झाली. गुजरात विधानसभेसाठी निवडणूक होते आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तान, अफगाणिस्तानचे मुद्दे मांडत आहेत. गुजरातबाबतही थोडी तुमची भूमिका मांडा असा उपरोधिक टोलाही राहुल गांधी यांनी लगावला. बनासकांठा या ठिकाणी झालेल्या सभेत ते बोलत होते.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत पातळी सोडून टीका केली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी  त्यांच्या भाषणात काँग्रेसचे नेते मला शिव्या देण्याशिवाय काय करतात? असा प्रश्न विचारत काँग्रेसवर कडाडले होते. तसेच मणिशंकर अय्यर यांच्या घरी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक झाली होती असाही आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता. हा आरोप काँग्रेसने फेटाळला. तसेच आज राहुल गांधी यांनी भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत गुजरातबाबत बोला असा सल्ला दिला.

गुजरात विधानसभा निवडणूक भाजपने प्रतिष्ठेची केली आहे. कारण गुजरातचे विकासाचे मॉडेल दाखवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुका जिंकल्या. तर गुजरातमध्ये २२ वर्षे भाजपने काय केले? विकासाचा दावा केला जातोय प्रत्यक्षात विकास कुठे आहे? असे प्रश्न काँग्रेसने उपस्थित केले. त्यामुळे या निवडणुकीत काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. १८ डिसेंबरला लागणाऱ्या निकालात हे चित्र स्पष्ट होणार आहे.