काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए) खासदारांची बैठक बुधवारी पार पडली. सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हेदेखील उपस्थित होते. या बैठकीदरम्यान, राहुल गांधी हे आपल्या काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर ठाम असल्याचे दिसून आले. आपण काँग्रेसच्या अध्यक्षपदी कायम राहणार नसल्याचेही त्यांनी खासदारांना सांगितल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, यूपीएच्या 51 खासदारांना राहुल गांधी यांची मनधारणी करण्यात अपयश आले आहे.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पुन्हा एकदा मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता. हा पराभव केवळ काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची जबाबदारी नसून ती सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांनी केवळ स्वत: याची जबाबदारी न स्वीकारता अध्यक्षपदी कायम राहावे, अशी विनंती शशी थरूर आणि मनीष तिवारी यांनी केली. याव्यतिरिक्त अन्य खासदारांनीही त्यांना अध्यक्षपदी कायम राहण्याची विनंती केली. परंतु राहुल गांधी यांनी राजीनाम्यावर ठाम राहण्याचा निर्णय घेतला.

लोकसभा निवडणुकीत मोठ्या पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती. यापूर्वीही काँग्रेसच्या बैठकीत त्यांनी आपण राजीनाम्यावर ठाम असल्याचे सांगितले होते. तसेच कार्यकारिणीच्या बैठकीतही त्यांनी अध्यक्षपदावरून पायउतार होणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी त्यांची मनधारणी करण्याचा प्रयत्न केला होता. तसेच त्यांचा पर्याय उपलब्ध नसल्याचेही म्हटले होते.