काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुजरातमधील दुसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या पूर्वसंध्येला स्थानिक वृत्तवाहिन्यांना दिलेली मुलाखत आचारसंहितेचा भंग असल्याचा आरोप करत भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. मात्र, भाजपची ही कृती म्हणजे त्यांच्या निराश मनोवृत्तीचे द्योतक असल्याची टीका माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केली. चिदंबरम यांनी ट्विट करून यासंदर्भात भाष्य केले. त्यांनी म्हटले की, निवडणूक आयोगाने आचारसंहितेचा भंग म्हणून फक्त राहुल गांधी यांच्या भाषणावरच कारवाईचा बडगा का उगारला? राहुल यांच्याकडून स्पष्टीकरण मागवत असतानाच आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या इतर नेत्यांनी केलेल्या भाषणांकडे दुर्लक्ष केले. प्रचाराची मुदत संपल्यानंतर कोणत्याही राजकीय पक्षातील व्यक्तीने मुलाखत देऊ नये, हा नियम सर्वांसाठी सारखा असला पाहिजे. मात्र, काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण केले. भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनीही मुलाखती दिल्या. मग निवडणूक आयोगाने एकट्या राहुल गांधींनाच नोटीस का धाडली, असा सवाल चिदंबरम यांनी उपस्थित केला.

गुजरात निवडणुकीचा प्रचार संपला असताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांची मुलाखत प्रसारित केल्याबद्दल वृत्तवाहिन्यांवरही कारवाई होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगानेच तसे आदेश दिले आहेत. ज्या वाहिन्यांनी ही मुलाखत वा तिचा अंश प्रसारित केला त्यांच्याविरुद्धही १२६(१)(ब) या कलमाखाली तक्रार नोंदवण्याची सूचना आयोगाने राज्य निवडणूक आयुक्तांना केली आहे. या वाहिन्यांनी मतदान संपेपर्यंत ही मुलाखत वा तिचा अंश प्रसारित करू नये, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, काँग्रेसने भाजपच्या तक्रारीवरच टीका केली आहे. २०१४च्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाच्या दिवशीच मोदी यांनी मतदानाआधी भाजपचे निवडणूक चिन्ह उंचावून दाखवले होते. त्यांच्यावर आयोगाने काहीही कारवाई केली नाही. तसेच पहिल्या टप्प्याच्या मतदानाआधीच मोदी आणि अन्य भाजप नेत्यांनी गुजरातमध्ये पत्रकार परिषद घेतली होती. तेव्हा नोटिस पाठवायची वा कारवाई करायची तर प्रथम त्यांच्यावर करा, अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी केली. भाजप सरकार निवडणूक आयोगाचा वापर करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.