काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर खोचक टीका केली आहे. केंद्र सरकारने नुकतीच परदेशी करोना व्हॅक्सिनला मजुरी देण्याच्या प्रक्रियेमध्ये सुधारणा करून ती वेगवान करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावरून राहुल गांधींनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. “आधी ते तुमच्याकडे दुर्लक्ष करतील. नंतर ते तुमच्यावर हसतील. नंतर ते तुमच्याशी भांडतील. आणि मग तुमचा विजय होईल”, असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे. यापूर्वी राहुल गांधींनी ही प्रक्रिया सुलभ करण्याविषयी सल्ला दिल्यानंतर भाजपाकडून त्यांच्यावर जोरदार आगपाखड करण्यात आली होती. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी तर थेट राहुल गांधींनी व्हॅक्सिनबद्दल कळत नसल्याचीच टीका केली होती.

 

केंद्र सरकारने मंगळवारी लसींना मान्यता देण्याच्या आपल्या धोरणामध्ये मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, परदेशी कंपन्यांना त्यांच्या लसी भारतीय बाजारपेठेत उपलब्ध करून देता येणार आहेत. या निर्णयानुसार, अमेरिका, युरोप, ब्रिटन आणि जपानमध्ये मान्यता देण्यात आलेल्या लसींना भारतात वितरीत करण्यासाठी आधी असलेली दुसऱ्या फेजच्या आणि तिसऱ्या फेजच्या क्लिनिकल चाचण्यांची सक्ती आता रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे या देशांमध्ये मिळणाऱ्या लसी भारतात उपलब्ध होणं आता अधिक सुकर झालं आहे. या निर्णयामुळे फायझर, मॉडेर्ना आणि जॉनसन अँड जॉनसन यांच्या लसींना काही अटींवर भारतात परवानगी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

राहुल गांधींनी लिहिलं होतं पत्र!

राहुल गांधींनी याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून अशा प्रकारे परदेशी लसींना मान्यता देण्याची प्रक्रिया अधिक जलद गतीने करण्यासंदर्भात मागणी केली होती. त्यासोबतच, देशातून परदेशात होणारी लसींची निर्यात देखील थांबवण्याची मागणी त्यांनी केली होती. देशात सगळ्यांनाच लस द्यायला हवी, असं ते म्हणाले होते. त्यावरून भाजपाकडून त्यांना लक्ष्य करण्यात आलं होतं.

 

राहुल गांधींवर रविशंकर प्रसाद यांनी लॉबिंग करत असल्याचा आरोप केला होता. “पार्ट टाईम राजकारणी म्हणून अपयशी ठरल्यानंतर आता राहुल गांधी पूर्णवेळ लॉबिंग करू लागले आहेत की काय? आधी त्यांनी फायटर विमानं बनवणाऱ्या कंपन्यांसाठी लॉबिंग केलं. आता ते परदेशी लसींना मान्यता देण्याची मागणी करून या फार्मा कंपन्यांसाठी लॉबिंग करत आहेत”, असं प्रसाद म्हणाले होते.

 

“राहुल गांधींना हे कळत नाही”

“करोनासारख्या साथीशी लढा देणं हा काही खेळ नाही. लसीकरणासोबतच चाचण्या करणं, बाधितांचं ट्रेसिंग करणं आणि त्यांच्यावर उपचार करणं हे देखील महत्त्वाचं आहे. पण राहुल गांधींची समस्या ही आहे की त्यांना हे सगळं कळत नाही”, असं देखील रविशंकर प्रसाद म्हणाले होते.

गेल्या काही दिवसांमध्ये देशात अनेक भागांमध्ये करोना लसीचा तुटवडा असल्याची तक्रार ऐकायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर परदेशी लसींना मान्यता मिळण्याची प्रक्रिया सुलभ आणि वेगवान झाल्यामुळे लसींच्या उपलब्धतेच्या दृष्टीने त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे.