काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विमान अपघातात संजय गांधींच्या मृत्यूवर मोठा खुलासा केला. जर काका संजय गांधी यांनी माझे वडील राजीव गांधी यांचे म्हणणे ऐकले असते तर कदाचित अपघात झाला नसता, असे राहूल गांधी म्हणाले. राहुल गांधी यांना त्यांचे वडील राजीव गांधी यांच्याप्रमाणे विमान उडवण्याचा शौक आहे. वडील राजीव गांधी यांची आठवण करून देत राहुल गांधी म्हणाले की, त्यांचा असा विश्वास आहे की पायलट असणे सार्वजनिक जीवनातही बरेच काही शिकवते.

गुरुवारी काँग्रेसच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये राहुल गांधी म्हणाले की, ज्या दिवशी राजीव यांचे बंधू संजय गांधी यांचे विमान अपघातात निधन झाले, त्या दिवशी राजीव यांनी त्यांना ‘पिट्स’सारखे आक्रमक विमान उडवण्यास मनाई केली होती. पण त्यांनी ऐकले नाही.

ज्या दिवशी भीषण अपघात झाला…

भारतीय युवक काँग्रेसने आयोजित केलेल्या राजीव गांधी यांच्या फोटो प्रदर्शनात बनवलेल्या व्हिडीओमध्ये राहुल गांधी यांनी वडिलांसोबत विमानात घालवलेल्या आठवणी सांगितल्या. ते दररोज सकाळी वडिलांसोबत विमानात बाहेर जायचे आणि दोघांनाही विमान उडवणे आवडायचे. व्हिडिओमध्ये राहुलने त्यांचे काका संजय गांधी यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याची आठवण करून दिली आणि सांगितले की, ज्या दिवशी भीषण अपघात झाला त्या दिवशी राजीव गांधींनी आपल्या लहान भावाला विमान उडवण्यास मनाई केली होती.

देशाचे नेतृत्व करताना पत्रकार परिषदेला सामोरे न जाणारे मोदी जगातील एकमेव नेते – पी चिदंबरम

राहुल गांधी म्हणाले, “माझे काका एक विशेष प्रकारचे विमान उडवत होते – ते पिट्स विमान होते. ते खूप वेगवान विमान होते. माझ्या वडिलांनी त्यांना रोखले होते. पण त्यांनी ऐकले नाही. माझ्या काकांना तेवढा अनुभव नव्हता. काकांना केवळ तीन ते साडेतीन तास विमान उडवण्याचा अनुभव होता. २३ जून १९८० रोजी नवी दिल्लीच्या सफदरजंग विमानतळाजवळ विमान अपघातात संजय गांधी यांचा मृत्यू झाला होता.