लोकसभेत सध्या देशाच्या राजकीय नेतेमंडळींमध्ये होणाऱ्या चर्चांना सध्या एक नाट्यमय वळण मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. राहुल गांधी यांच्या भाषणानंतर आणि मोदींच्या गळाभेटीनंतर आता सोशल मीडियावर लोकसभेचं हे सत्र बहुचर्चित विषय ठरत आहे. राहुल गांधींचं भाषण ही या साऱ्यामध्ये अधोरेखित करण्याजोगी गोष्ट ठरत आहे.

लोकसभेत अविश्वास प्रस्तावाविषयी आपलं मत मांडताना त्यांनी भाजप, आरएसएस आणि पंतप्रधानांचे आभार मानत त्यांच्यामुळेच आपल्याला भारतीय असणं म्हणजे काय, असं म्हणत टोला दिला. त्यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनीच ट्विट करण्यास सुरुवात केली. मोदी आणि काँग्रेस अध्यक्षांची गळाभेटही या साऱ्यामध्ये अग्रस्थानी होती. पण, या गळाभेटीपेक्षा विशेष प्रकाशझोतात असणारी गोष्ट ठरली ती म्हणजे राहुल गांधी यांच्या चेहऱ्यावरील हावभाव. लोकसभेतील भाषण संपल्यानंतर राहुल गांधी यांनी मोठ्या मिश्किलपणे हसत ज्या प्रकारे डोळा मारला ते पाहता नेटकऱ्यांना मल्याळम अभिनेत्री प्रिया वारियरची आठवण झाली.

‘मानिक्य मलरया पूवी’ या गाण्यातून अवघ्या काही सेकंदांसाठी झळकलेली अभिनेत्री प्रिया वारियर ही तिच्या चेहऱ्यावरील खोडकर हावभावांसाठी आणि नजरेच्या बाणासाठी प्रसिद्धीझोतात आली होती. सोशल मीडियावर याच गोष्टींमुळे तिचे असंख्य चाहतेही घायाळ झाले होते. राहुल गांधी यांच्या चेहऱ्यावरील भाव पाहता नेटकऱ्यांना पुन्हा एकदा प्रियाचीच आठवण झाली आहे. ट्विटरच्या माध्यमातून अनेकांनी त्याविषयीच्या पोस्ट केल्याचंही पाहायला मिळालं.

BLOG: ‘होय मी हिंदू आहे’ का म्हणाले राहुल गांधी?

देशाचं राजकारण असो किंवा मग आणखी काही. कलाविश्वाशी या गोष्टी जोडत त्याकडे विनोदी अंगाने पाहण्याचा दृष्टीकोन सोशल मीडियावर बऱ्याचदा दिल्याचं पाहायला मिळतं.