ऑटोमोबाईल क्षेत्रातील मंदीला ओला-उबर टॅक्सी सेवा वापण्याची लोकांची मानसिकता कारणीभूत असल्याचे विधान अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी केले होते. अर्थमंत्र्यांच्या यांचं वक्तव्यावरून राहुल गांधी यांनी टीका केली आहे. “देशाच्या अर्थव्यवस्थेला मुर्ख कहाण्या पसरवण्याची नाही, तर ठोस उपाययोजनांची गरज आहे”, अशा शब्दात राहुल यांनी सीतारामण यांना उत्तर दिले आहे.

देशाच्या वाहन क्षेत्रातील मंदीला नवतरुण पिढीतील प्रवाशांची बदलती मानसिकता कारणीभूत असल्याचे वक्तव्य अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी चेन्नईत केले होते. प्रवासासाठी आता ओला-उबरसारख्या वाहतुकीच्या सुविधांना प्राधान्य दिले जात असल्याने वाहन उद्योगाला विक्रीतील घसरणीला सामोरे जावे लागत असल्याचे सांगत सीतारामन यांनी अर्थव्यवस्थेवरून सरकारवर होत असलेल्या टीकेवर सारवासारव केली होती.

अर्थमंत्र्यांच्या ओला उबर विधानावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही टीका केली आहे. राहुल गांधी म्हणाले, “भारतीय अर्थव्यवस्थेला मतप्रचार, बातम्या आणि मुर्ख कहाण्या पसरवण्याची गरज नाही. तर अर्थव्यवस्थेला पूर्वपदावर आणण्यासाठी ठोस उपाययोजन करण्याची गरज आहे. अर्थव्यवस्था ढबघाईला गेली आहे, हे कबूल करणे ही देखील एक चांगली सुरूवात आहे”, असा सल्लाही राहुल गांधी मोदी सरकारला दिला.

सलग दहाव्या महिन्यात वाहन विक्रीचा घसरणप्रवास सुरू आहे. कमी मागणीअभावी अनेक कंपन्यांनी उत्पादन कपात केली आहे. वाहन उद्योगावरील वस्तू व सेवा कर कमी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. वाहन निर्मात्या कंपन्यांची संघटना असलेल्या ‘सिआम’ने एकूण प्रवासी वाहन विक्री ४१.०९ टक्क्यांनी रोडावल्याचे जाहीर केले. तर सर्व गटातील मिळून वाहनांची विक्री २३.५५ टक्क्यांनी घसरली आहे. ऑगस्टमध्ये या क्षेत्राने विक्रीतील ऐतिहासिक घसरण नोंदविल्याचेही सियामने म्हटले होते.