अर्थमंत्री अरुण जेटली यांचे टीकास्त्र
देश तोडण्याची भाषा बोलणाऱ्यांबद्दल काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी सहानुभूती दाखवत असल्याचा आरोप करत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी टीकास्त्र सोडले. इंदिरा किंवा राजीव गांधी यांनी अशा गोष्टींना कधीच थारा दिला नाही. राहुल गांधी यांनी मात्र अशा व्यक्तींना सहानुभूती दाखवली, अशी टीका जेटली यांनी केली.
भाजयुमोच्या अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी जेटली यांनी विरोधकांचा समाचार घेतला. जेएनयू विद्यार्थी संघाचा अध्यक्ष कन्हैयाकुमारने जामिनावर सुटल्यावर जय हिंद घोषणा देणे व तिरंगा फडकावणे हा आमचा विजय आहे, असे जेटली यांनी स्पष्ट केले. देश तोडणाऱ्या प्रवृत्तींच्या विरोधात काँग्रेसने नेहमीच ठाम भूमिका घेतल्याची आठवण जेटली यांनी राहुल गांधी यांना करून दिली. अफजल गुरू, याकूब मेमन यांना सहानुभूती दाखवण्याची प्रवृत्ती पुढे येत आहे. अर्थात हा जिहादी किंवा माओवाद्यांचा छोटा गट आहे. मात्र देशविरोधी घोषणा देणाऱ्यांना काँग्रेस नेत्याने सहानुभूती दाखवावी हे दुर्दैव आहे. ही वैचारिक दिवाळखोरी असल्याची टीका त्यांनी केली.
राष्ट्रीय हिताच्या विरोधात बोलण्याची डाव्यांना खोड आहे, असा टोलाही जेटली यांनी लगावला. मोदी सरकार सत्तेत आल्यापासून सकारात्मक बदल होत असल्याचे सांगितले. घराणेशाही, भ्रष्टाचार तसेच भूक व दारिद्रय़ापासून मुक्तीसाठी जनतेने आम्हाला कौल दिल्याचे सांगितले. जेएनयूप्रकरणी सरकारने घेतलेल्या भूमिकेचे त्यांनी समर्थन केले.