आधीच महागाईचे चटके सोसणाऱ्या सर्वसामान्य शहरवासीयांनी इंधन दरवाढीचा धसका घेतला आहे. इंधनाचे दर वाढल्याने स्वयंपाकगृहात लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंसह सर्वच गोष्टी महाग होतील, रिक्षा-टॅक्सी, बेस्ट-एसटीची भाडेवाढ होऊन प्रवास महाग होईल, अशी भीती सर्वसान्यांमध्ये आहे. दरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी इंधन दरवाढीवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करत एक व्हिडीओ ट्विटरला शेअर केला आहे.

राहुल गांधी यांनी शेअर केलेल्या व्हिडीओत पंतप्रधान नरेंद्र मोदी पेट्रोलचा भाव कमी झाला की नाही ? असा सवाल जनतेला विचारताना दिसत आहे. त्यांच्या या प्रश्नावर सलमान खान खळखळून हसताना दाखवण्यात आला आहे. मोदींचा हा व्हिडीओ एका सभेतील आहे, तर सलमानचा व्हिडीओ कॉमेडी सर्कस या कॉमेडी शोमधील आहे. राहुल गांधींनी व्हिडीओच्या माध्यमातून मोदींची खिल्ली उडवली आहे.

ट्विटरला व्हिडीओसोबत राहुल गांधींनी कॅप्शन दिली आहे की, ‘गरिब आणि मध्यमवर्गीय वाढत्या इंधन दरवाढीचा आघात सहन करत आहेत. या व्हिडीओत आपले पंतप्रधान नक्कीच दुस-या देशबाद्दल बोलत आहेत’.