काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यातील खासदाराचे दर्शन आज लोकसभेत झाले. शून्य प्रहरात आपला मतदारसंघ अमेठीतील ‘फूड पार्क’ रखडला असल्याचे सांगून केंद्र सरकार सूडाचे राजकारण तर करीत नाही ना, असा संशय राहुल यांनी व्यक्त केला. त्यावर उत्तर देताना केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी हा प्रकल्प २०१२ अर्थात संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळापासूनच रखडला असल्याचे सांगून राहुल गांधी यांच्या आरोपातील हवाच काढून टाकली. ‘फूड पार्क’ प्रकल्प रद्द न करण्याची विनंती राहुल यांनी केली. बटाटय़ापासून ‘चिप्स’ बनवण्यासारखे प्रकल्प ‘फूड पार्क’ योजनेंतर्गत अमेठीतील २०० एकर जागेत उभारण्याचा निर्णय संपुआ सरकारने घेतला होता. मात्र संबधित खासगी कंपनीने हा प्रकल्प उभारण्यास नकार दिला असल्याची माहिती राजनाथ सिंह यांनी सभागृहात दिली.
सलग चौथ्यांदा राहुल गांधी लोकसभेत बोलले आहेत. अर्थात त्यांचे भाषण आजही सत्ताधारी भाजप सदस्यांनी शांतपणे ऐकले नाही. सातत्याने राहुल गांधी यांच्या भाषणादरम्यान व्यत्यय आणला जात होता. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या भाषणादरम्यान मात्र भाजप खासदार अत्यंत शांत राहतात. त्यामुळे भाजपने योजनापूर्वक राहुल यांनाच लक्ष्य करण्याची रणनीती आखली आहे. राहुल गांधी म्हणाले की, दोन रुपये किलो बटाटय़ाचे चिप्स दहा रुपयाला मिळतात. ही आर्थिक तफावत कशासाठी? शेतकरी व चिप्स उत्पादक कंपनी यांच्यात असलेल्या मध्यस्थांना दूर करण्याची मागणी राहुल यांनी केली. उत्तर प्रदेशातील अमेठीसह दहा जिल्ह्य़ांतील लाखो शेतकऱ्यांना या प्रकल्पाचा लाभ मिळणार होता. शेतकरी आपला माल थेट कंपनीला विकू शकणार होते. गतवर्षी अमेठीला गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मी इथे सूड (बदला) घेण्यासाठी नव्हे तर बदल घडवण्यासाठी आलो आहे,’ या वक्तव्याचा संदर्भ राहुल यांनी देत केंद्र सरकार त्यांच्या मतदारसंघातील कामकाजांच्या बाबत दुजाभाव करीत असल्याचा आरोप केला.गेल्या चार वर्षांत या प्रकल्पाचे काय झाले; याची चर्चा करणार नसल्याचे सांगत राजनाथ सिंह यांनी अप्रत्यक्षपणे संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या कार्यप्रणालीवर टीका केली. त्यामुळे काँग्रेस खासदार संतप्त झाले होते. विशेष म्हणजे हा प्रकल्प अद्याप कागदावरच आहे. या प्रकल्पांसाठी बिर्ला उद्योग समूहाने पुढाकार घेतला होता. मात्र आता त्यांनीच या ‘फूड पार्क’मध्ये सहभागी होणार नसल्याचे संसदीय कामकाज राज्य मंत्री राजीव प्रताप रूडी यांनी पत्रकारांना सांगितले.