लोकसभेत भाजप सदस्यांकडून गदारोळ, कामकाज तहकूब

नवी दिल्ली : झारखंड येथील निवडणूक प्रचार सभेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशातील बलात्कारांच्या घटनांबाबत मोदी सरकारवर टीका करताना ‘रेप इन इंडिया’ असा उल्लेख करून वक्तव्य केले. त्याचे तीव्र पडसाद शुक्रवारी लोकसभेत उमटले. राहुल गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणी भाजपच्या सदस्यांनी केली, तर राहुल यांच्यासारख्या नेत्यांना संसदेत राहण्याचा नैतिक अधिकार नाही, असे संरक्षणमंत्री राजनाथसिंह म्हणाले.

भाजपच्या महिला खासदारांनी सभागृहातील मोकळ्या जागेत धाव घेऊन राहुल यांच्यावर शाब्दिक हल्ला चढविला. सभागृहात गोंधळ निर्माण झाल्याने लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना कामकाज दोनदा तहकूब करावे लागले. त्यानंतर बिर्ला यांनी सभागृह संस्थगित होत असल्याचे जाहीर केले.

सभागृहात गोंधळ सुरू असताना द्रमुकच्या खासदार कनिमोळी राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ सरसावल्या, त्याचप्रमाणे काँग्रेसचे सदस्यही आसनांवरून उठले. राहुल गांधी यांनी सभागृहात शेरेबाजी केलेली नाही, त्यांनी देशात महिलांवर लैंगिक अत्याचार होत असल्याचा संदर्भ दिला, असे कनिमोळी म्हणाल्या. संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी, कनिमोळी यांचे मत दुर्दैवी असल्याचे सांगितले.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे ‘रेप इन इंडिया’ हे वक्तव्य भयंकर असल्याचे मत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केले आहे. महिलांच्या सन्मानाचे विस्मरण होऊन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशा प्रकारची वक्तव्ये करीत आहेत हे लज्जास्पद आहे, असेही सीतारामन यांनी म्हटले आहे.

माफी मागण्यास राहुल यांचा नकार

नवी दिल्ली : रेप इन इंडिया या वक्तव्याबद्दल कधीही माफी मागणार नाही, असे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी येथे स्पष्ट  केले. यूपीए सरकारच्या कालावधीत दिल्ली ही बलात्कारांची राजधानी बनल्याचे वक्तव्य केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच माफी मागावी, अशी मागणी राहुल यांनी केली.

आपण माफी मागावी अशी भाजपची मागणी आहे, मात्र आपण कधीही माफी मागणार नाही, असे राहुल यांनी संसदेबाहेर वार्ताहरांना सांगितले. मोदी यांनी ‘मेड इन इंडिया’बाबत मत व्यक्त केले, मात्र देशातील बलात्काराच्या वाढत्या घटना पाहून आपण केवळ आता भारत ‘रेप इन इंडिया’ झाला आहे, असे म्हटले, असे गांधी म्हणाले.

भाजप, नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी संपूर्ण ईशान्य भारत पेटवला आहे, त्यापासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी ते आपल्या माफीच्या मागणीची खेळी खेळत आहेत, असेही गांधी म्हणाले. दिल्ली ही बलात्कारांची राजधानी झाली असल्याचे वक्तव्य मोदी यांनी केले होते, त्याची फीत आपल्याकडे आहे, संपूर्ण देशाला कळावे यासाठी ती फीत आपण ट्विटरवर टाकणार आहोत, असे गांधी यांनी सांगितले. ईशान्य भारत पेटविल्याबद्दल मोदी यांनी माफी मागावी, असेही ते म्हणाले.