बिकानेरमध्ये एका १७ वर्षीय दलित युवतीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याचे प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी केला. या युवतीच्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणीही गांधी यांनी केली. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दलितांना सापत्नभावाची वागणूक देत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
राजस्थानचे प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांच्यासमवेत राहुल गांधी यांनी सदर युवतीच्या तिरमोही येथे वास्तव्याला असलेल्या कुटुंबीयांची भेट घेतली. पोलिसांनी केलेल्या कारवाईने युवतीच्या वडिलांचे समाधान झाले नसल्याचे या वेळी गांधी म्हणाले. या युवतीच्या वडिलांनी आणि अन्य कुटुंबीयांनी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. पोलिसांच्या कारवाईने त्यांचे समाधान झालेले नाही, त्यामुळे सीबीआय चौकशी करून आम्हाला न्याय द्यावा, अशी त्यांची मागणी असल्याचे गांधी म्हणाले.
रोहित वेमुला आत्महत्याप्रकरणा प्रमाणे हे प्रकरणही दडपण्यात येत आहे. कुटुंबाला न्याय द्यावयाचा असल्यास सीबीआय चौकशीला मान्यता द्यावी, असे राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांना आपल्याला सांगावेसे वाटते, असेही गांधी म्हणाले. आपल्या कन्येची हत्या करण्यात आली असतानाही पोलीस ती आत्महत्या असल्याचे म्हणत आहेत. त्यांच्या चौकशीवर आमचा विश्वास नसल्यामुळे सीबीआय चौकशी करावी, अशी युवतीच्या वडिलांची मागणी आहे.