उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या विरोधात काँग्रेसचे सदस्य आक्रमक होऊन लोकसभेत घोषणाबाजी करीत असताना राहुल गांधी यांनी दोनदा आपला मोबाइल आई सोनिया गांधी यांच्याजवळ बघण्याकरिता दिला. दुसऱ्यांदा सोनियांनीही तो संदेश वाचला मग मागे बसलेल्या कमलनाथ यांच्याकडे वाचण्याकरिता दिला. यामुळेच राहुल यांच्या मोबाइलमध्ये आलेला संदेश कोणाचा याची चर्चा सुरू झाली.

लोकसभेचे कामकाज सुरू होताच काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी उत्तराखंडवरून चर्चा सुरू करण्याची मागणी केली. अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी ही मागणी फेटाळून लावली असता काँग्रेस सदस्य अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत घोषणाबाजी करीत होते. सरकारच्या विरोधात घोषणा देणाऱ्यांमध्ये राज्यातील काँग्रेस खासदार राजीव सातव आघाडीवर होते. थोडय़ा वेळाने खरगे यांच्यासह काँग्रेस आणि आपच्या सदस्यांनी अध्यक्षांसमोर बसकण मारली.

सभागृहात थोडे उशिराच आलेले राहुल गांधी यांनी सोनियांकडे वाचण्याकरिता मोबाइल दिला. त्यातील संदेश वाचून सोनियांनी मोबाइल परत राहुल यांच्याकडे दिला. १० मिनिटाने राहुल यांनी पुन्हा मोबाइल सोनियांकडे दिला. सोनियांनी त्यातील संदेश वाचून मग मागे बसलेल्या कमलनाथ यांच्याकडे तो मोबाइल वाचण्याकरिता दिला. त्यातील संदेश वाचल्यावर सोनिया आणि कमलनाथ  यांच्यात काही काळ बोलणे झाले. मग कमलनाथ यांनी मोबाइल राहुल गांधी यांना परत दिला. या साऱ्या घडामोडी समोर बसलेले भाजपचे सदस्य बारकाईने बघत होते. राहुल यांचा काय आग्रह धरला असावा याचा वेध संसदीय कार्यमंत्री व्यंकय्या नायडू घेत होते.