राजस्थानमध्ये कथित गोरक्षकांनी केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला असतानाच राजस्थानचे गृहमंत्री गुलाबचंद कटारिया यांनी या घटनेवर वादग्रस्त प्रतिक्रिया दिली आहे.गोरक्षकांनी चांगले काम केले. पण त्यांनी कायद्याचे उल्लंघन केले अशी प्रतिक्रिया गुलाबचंद कटारिया यांनी दिली आहे.

राजस्थानमध्ये अलवार महामार्गावर सहा वाहनांमधून गायी नेत असताना २०० हून अधिक गोरक्षकांनी चालकांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मारहाण केली होती. या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला होता. या मारहाणीप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. मात्र गृहमंत्री गुलाबचंद कटारिया यांनी वादग्रस्त विधान करुन नव्या वादाला तोंड फोडले. गोरक्षकांनी चांगले काम केले. पण लोकांना मारहाण करुन त्यांनी कायद्याचे उल्लंघन केले असे ते म्हणालेत. गायींच्या तस्करीवर बंदी असल्याचे निदर्शनास आणून देत गुलाबचंद कटारिया म्हणाले, गोरक्षकांनी गायींची तस्करी हे थांबवून चांगले काम केले. गृहमंत्र्यांनेच अशा स्वरुपाचे विधान केल्याने वाद निर्माण झाला आहे. दुसरीकडे असदुद्दीन ओवैसी यांनी या घटनेवर टीकास्त्र सोडले. गोरक्षेच्या नावावर देशभरात गुंडगिरी सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

गोरक्षकांनी मारहाण केलेल्या व्यक्ती हा गायीची तस्करी करत नव्हता. दुग्ध व्यवसायासाठी तो गायीला नेत होता अशी माहिती उघड झाली आहे. मेवातच्या नूह गावात राहणाऱ्या ५५ वर्षीय पहलू खान मागील शुक्रवारी एक दुभती म्हैस खरेदी करण्यासाठी जयसिंगपूरवरून जयसिंहकडे जाण्यास निघाले होते. पहूल खान हे दुग्ध व्यवसाय करणारे शेतकरी होते. रमजानच्या काळात दूध उत्पादन वाढवण्याचा त्यांचा विचार होता. मात्र, शनिवारी जेव्हा गाय विकणाऱ्या व्यक्तीने पहलू खानसमोरच १२ लिटर दूध काढून दाखवले. तेव्हा पहलूने म्हैस ऐवजी गाय खरेदी केली. परंतु, त्यांचा हाच निर्णय जीवघेणा ठरला.