राजस्थानातील शेतकरी आंदोलन पेटण्याची चिन्हे आहेत. जयपूर विकास प्राधिकरणाकडून (जेडीए) गृहप्रकल्पासाठी जबरदस्तीने भूसंपादन करण्यात येत आहे. त्यास शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. त्यांनी स्वतःला जमिनीत गाडून घेत सरकारचा अनोख्या पद्धतीने निषेध केला आहे. आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

जयपूर विकास प्राधिकरणाच्या गृहप्रकल्पासाठी जयपूरजवळील निंदर गावातील शेतकऱ्यांच्या जमिनीचे भूसंपादन करण्यात येत आहे. जबरदस्तीने करण्यात येणाऱ्या या भूसंपादनाला शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला आहे. शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. जमिनी देऊन आम्ही उपाशी मरायचे का, असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे. महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून निंदर गावातील शेतकऱ्यांनी खड्डे खोदून त्यात स्वतःला गाडून घेतले आहे. ‘भूमी समाधी सत्याग्रह’ असे या आंदोलनाला नाव दिले आहे. या आंदोलनात शेतकरी महिलाही सहभागी झाल्या आहेत. राजस्थान सरकार आमच्या मागण्या मान्य करत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे.