राजस्थानमध्ये काँग्रेस पक्षामधील अंतर्गत वाद पुन्हा उफाळून आल्याची चिन्हं दिसत आहे. पक्ष राजकीय संकटाच्या तोंडावर उभा असतानाच सचिन पायलट यांना समर्थन देणाऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहेत. अनेक आमदार थेट सचिन पायलट यांना पाठिंबा देण्यासाठी जाहीरपणे समोर येत आहे. राजस्थान काँग्रेसमध्ये काहीतरी गोंधळ सुरु असून अंतर्गत वादाचे पडसाद आता प्रसारमाध्यमांसमोरही येत आहेत. याचाच प्रत्यय आज पुन्हा आला.

काँग्रेसचे दिग्गज नेते आणि सचिन पायलट यांचे वडील राकेश पायलट यांच्या २१ व्या पुण्यतिथीनिमित्त हा प्रकार घडला. दौसाजवळील भंडाणा येथे राकेश पायलट यांच्या स्मारकाला पुण्यतिथिनिमित्त अभिवादन करण्यासाठी पोहचलेल्या पायलट समर्थकांमध्ये सहभागी असणाऱ्या टोडाभीमचे आमदार पृथ्वीराज मीणा यांनी पायलट यांनी केलेलं एक वक्तव्य सध्या चर्चेत आहे. पायलट साहेब तिथे सांगतील तिथे आम्हा जाण्यासाठी तयार आहोत. पायलट यांनी जीव देण्यास सांगितला तर जीव देण्यासही आम्ही तयार आहोत, असं मीणा यांनी म्हटलं आहे.

नक्की वाचा >> भाजपानं सचिन तेंडुलकरशी बोलणी केली असतील, माझ्याशी बोलण्याची त्यांच्यात धमक नाही – सचिन पायलट

मीणा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना वरिष्ठांकडून पायलट यांचं ऐकून घेतलं जात नाही हा दावा चुकीचा असल्याचं म्हटलं आहे. या प्रकरणासंदर्भात वरिष्ठ नेत्यांनी तातडीने निर्णय़ घेतला पाहिजे. सर्वच जण मंत्रीमंडळाचा विस्तार होण्याची वाट पाहत आहेत. मागील काही काळापासून राज्यात बरीच लोकउपयोगी कामं झाली आहेत, असं सांगत मीणा यांनी गहलोत सरकारच्या कामाचं कौतुक केलं. मात्र आपण पायलट यांच्यासोबत एकनिष्ठ असल्याचंही मीणा यांनी अधोरेखित केलं.

तर दुसरीकडे मुरारीलाल मीणा यांनी आपण कट्टर काँग्रेस समर्थक असून काँग्रेस पक्षासाठी काम करत असल्याचं सांगितलं. मुरारीलाल यांनी पक्षांतर्गत संघर्षासंदर्भात बोलताना पक्षामध्ये एखादा आवाज उठवत असेल तर हा लोकशाही पक्ष असल्याचा संकेत आहे. अशाप्रकारे आवाज उठवणं काही चुकीचं नाहीय, असं म्हटलं आहे. पक्षांतर्गत विषयांबद्दल मी आणि पायलटही बोलत राहू पण याचा अर्थ असा होत नाही की आम्ही पक्षासोबत नाहीत, असंही मुरारीलाल यांनी म्हटलं आहे.

राजस्थानमधील राजकीय घडामोडींमागील कारण?

दोनच दिवसांपूर्वी काँग्रेसला उत्तर प्रदेशमध्ये मोठा फटका बसला असून पक्षाचे उत्तर प्रदेशमधील महत्त्वाचे नेते जितिन प्रसाद यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. पक्षाच्या कार्यपद्धतीवर टीका करत ते भाजपामध्ये दाखल झाले. मात्र, त्यापाठोपाठ सचिन पायलट देखील भाजपामध्ये जाणार असल्याच्या चर्चांना वेग आला आहे. काही दिवसांपूर्वी सचिन पायलट नाराज असल्याच्या चर्चा होत्या. त्यांनी देखील पत्रकार परिषदांमधून आपली नाराजी बोलून दाखवली होती. या पार्श्वभूमीवर राजस्थानमधील राजकारणातील घडामोडींना मागील काही दिवसांपासून वेग आलाय.