तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामी हे स्वतःला करूणानिधींपेक्षाही मोठे समजतात का? असे म्हणत अभिनेते रजीनकांत यांनी पलानीस्वामी यांच्यावर टीका केली आहे. करूणानिधी यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी पलानीस्वामी आले नसल्याने रजीनकांत यांनी त्यांना शेलक्या शब्दात झापले आहे. करूणानिधी यांना अखेरचा निरोप देताना राज्यपाल, इतर राज्यांचे मुख्यमंत्री काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आले होते. मग मुख्यमंत्री पलानीस्वामी का आले नाहीत? फक्त पलानीस्वामीच नाही तर सगळ्या मंत्रिमंडळाने यायला हवे होते असे म्हणत रजनीकांत यांनी त्यांना झापले आहे. तुम्ही एमजीआर किंवा जयललिता आहात का? असा खोचक प्रश्नही त्यांनी विचारला.

एमजीआर आणि जयललिता हे दोघेही करूणानिधींचे विरोधक होते. गेल्या आठवड्यात एम. करूणानिधी यांचे निधन झाले. त्यानंतर तामिळनाडूच्या चित्रपटसृष्टीतर्फे श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी रजनीकांत यांनी पलानीस्वामींवर टीका केली. करूणानिधी सत्तेत नव्हते मात्र देशभरातले नेते त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी आले होते. करूणानिधी हे माझे जुने स्नेही होते असाही उल्लेख रजनीकांत यांनी केला.

एवढेच नाही तर तामिळनाडूची जनता मोठ्या प्रमाणावर करूणानिधींना अखेरचा निरोप देण्यासाठी हजर होती असेही त्यांनी स्पष्ट केले. इतक्या मोठ्या संख्येने जनता उपस्थित होती की अनेक दिग्गज नेत्यांना जनसागरातून वाट काढत जावे लागले असेही रजनीकांत यांनी म्हटले आहे. एम. के. स्टॅलिन यांना त्यांच्या पित्याला निरोप देताना अश्रू अनावर झाले होते. त्यांच्यासोबत करूणानिधी यांचा आशीर्वाद कायमच राहिल असेही रजनीकांत यांनी म्हटले आहे.एम. करूणानिधी हे एक महान नेते होते. त्यांचे आशीर्वाद आपल्यासोबतही राहतील असा विश्वास रजनीकांत यांनी व्यक्त केला. तामिळनाडूच्या इतर अभिनेत्यांनीही या शोकसभेत करूणानिधी यांना आदरांजली वाहिली.