इस्लामाबादमधील ‘सार्क‘ परिषदेमध्ये केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला त्यांच्याच भूमीवर खडेबोल सुनावले. पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालत असून ते योग्य नसल्याचे त्यांनी सुनावले. बुऱ्हान वानीचे समर्थन करणाऱ्या पाकिस्तानला त्यांनी परिषदेमध्ये संबोधित करताना उत्तर दिले. डिजिटल तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे अधिक जोरात प्रसार होणारा दहशतवाद धोकादायक असून, त्याला रोखणे गरजेचे असल्याचे देखील राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. राजनाथ सिंह यांच्या भाषणावेळी मीडियाला प्रवेश नाकारला होता. या परिषदेचे वृतांकन करण्यासाठी पीटीव्ही व्यतिरिक्त अन्य कोणत्याही प्रसारमाध्यमांना परवानगी देण्यात आली नव्हती. दरम्यान, राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानवर नाराजी व्यक्त करत दुपारच्या भोजनावर बहिष्कार टाकल्याची माहिती मिळाली आहे. पहिल्याच दिवशी दूतावासांच्या बैठकीत पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरिफ यांनी काश्मीरवर भाष्य केले. काश्मीर हा भारताचा अंतर्गत वाद नाही, असा संदेश जगभर देण्याची विनंती त्यांनी दुतावासांना केली होती. पूर्वीपेक्षा आज पाकिस्तान जगाशी जोडला गेला आहे, असे मत पाकिस्तान परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सल्लागार अजिज सरताज यांनी व्यक्त केले. संबंधित परिषदेनंतर राजनाथ सिंह भारताकडे येण्यासाठी इस्लामाबाद विमानतळावर दाखल झाले आहेत.