राज्यसभेच्या जागांसाठी झालेल्या उमेदवार निवडीच्या प्रक्रियेत डावे पक्ष आणि कँाग्रेसच्या आमदारांनी विरोधी मतदान केल्याचा फायदा पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल कँाग्रेसला झाला आहे. तर आंध्रप्रदेशमध्येही कँाग्रेस आमदारांच्या विरोधी मतदानाचा फायदा टीआरएस पक्षाला झाला असून प्रथमच त्यांच्या उमेदवाराला राज्यसभेवर जाण्याची संधी मिळाली आहे.
राज्यसभेच्या ५५ जागांपैकी ३७ सदस्यांची १२ राज्यांमधून बिनविरोध निवड झाली आहे. तर १८ जागांसाठी शुक्रवारी मतदान प्रक्रिया पार पडली. बिनविरोध निवड झालेल्या उमेदवारांमध्ये महाराष्ट्र (७), तामिळनाडू (६), बिहार (५), गुजरात (४), मध्यप्रदेश, राजस्थान (प्रत्येकी ३) हरियाणा, छत्तीसगड आणि झारखंड (प्रत्येकी दोन) आणि हिमाचल प्रदेश, मणिपूर आणि मेघालय (प्रत्येकी एक)यांचा समावेश आहे.
दरम्यान, शुक्रवारी पार पडलेल्या निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये  चित्रपट अभिनेते मिथुन चक्रवती, चित्रकार जोगन चौधरी, उद्योगपती के. डी. सिंग यांच्यासह पत्रकार अहमद हसन यांची राज्यसभेवर वर्णी लागली आहे. डाव्या पक्षांचे सुनील मोंडल, अतानु देब अधिकारी आणि दशरथ तिर्की यांच्यासह कँाग्रेसच्या सुशील रॉय आणि इमामी बिस्वास यांनी विरोधी मतदान करीत तृणमूलच्या उमेदवारांना पाठिंबा दिल्यामुळे तृणमूल कँाग्रेसला लाभ झाला आहे. यामुळे कँाग्रेसने आपल्या दोन्ही आमदारांना निलंबित केले आहे.
 पश्चिम बंगालप्रमाणे आंध्रप्रदेशमध्येही काँग्रेस आमदारांनी विरोधी मतदान केल्याचा फायदा तेलंगणा राष्ट्र समितीला मिळाला आहे. आंध्रात कँाग्रेसला तीन जागा तर तेलगु देसम पक्षाला दोन आणि तेलंगणा राष्ट्र समितीला एका जागेचा फायदा झाला आहे. टीआरएसचे विधानसभेत केवळ १७ आमदार आहेत. मात्र स्वतंत्र तेलंगणाला विरोध करणाऱ्या आमदारांसह  भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या आमदारांनी पाठिंबा दिल्यामुळे टीआरएसचे केशव राव यांचा विजय झाला.