दिल्लीत शेतकऱ्यांनी आज चक्का जाम आंदोलन केलं. यावेळी भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांचं वेगळचं रुप पहायला मिळालं. गाझिपूर बॉर्डरवर आंदोलन करणाऱ्या टिकैत यांनी त्यांचा मार्ग रोखणाऱ्या पोलिसांसमोर हात जोडूले आणि जय जवान, जय किसानच्या घोषणा दिल्या. तसेच आपण सर्वजण भाऊ-भाऊ आहोत असंही ते पोलिसांना म्हणाले.

टिकैत म्हणाले, “शेतकरी आणि जवान देशाचा कणा आहेत. शेतकरी आपल्या अधिकारांसाठी आंदोलन करत आहेत तर पोलीस आपलं कर्तव्य निभावत आहेत. त्याचं कोणाशीही शत्रूत्व नाही. हे जवान तर आपले भाऊ आहेत. त्यांच्या कर्तव्यनिष्ठेला आपण शतशः नमन करतो. शेतकऱ्यांच्या मागण्या तर भाजपा सरकारकडे आहेत. ज्यांनी तीन काळे कायदे आणून भाकरी तिजोरीत बंद करण्याचा प्रयत्न केला आहे” आपले हक्क मिळवल्याशिवाय शेतकरी दिल्लीच्या सीमेवरुन कोणत्याही परिस्थितीत आपल्या घरी परतणार नाहीत, असंही टिकैत यांनी म्हटलं आहे.

टिकैत यांना शेतकऱ्यांची साथ वारसाहक्कानं मिळाली आहे. त्यांचे वडील महेंद्रसिंह टिकैत हे देखील शेतकरी नेते होते. टिकैत ४४ वेळा तुरुंगात जाऊन आले आहेत. मध्य प्रदेशातील भूमी अधिग्रहण कायद्याविरोधात आंदोलन करताना टिकैत ३९ दिवस तुरुंगात होते. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या ऊसाला भाव मिळावा यासाठी त्यांनी संसदेच्या बाहेर आंदोलन केलं होतं. तेव्हा त्यांची रवानगी तिहार तुरुंगात करण्यात आली होती. त्यावेळी टिकैत यांनी संसद भवनाबाहेरच ऊस पेटवून दिला होता.

राकेश टिकैत यांनी कायद्याचं शिक्षण घेतलं असून एलएलबीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं आहे. राकेश टिकैत १९९२ मध्ये पोलीस कॉन्स्टेबल म्हणून भरती झाले होते. १९९३-९४ मध्ये लाल किल्ल्यावर वडील महेंद्रसिंह टिकैत यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु असताना त्यांनीही यामध्ये भाग घेतला होता. जेव्हा सरकारने आंदोलन चिरडण्यासाठी दबाव वाढवला तेव्हा त्यांनी आपली पोलीसची नोकरी सोडून ते शेतकऱ्यांसोबत उभे राहिले होते.