पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी (५ ऑगस्ट) अयोध्येतील राम मंदिराचं भूमिपूजन करण्यात आलं. या कार्यक्रमाला अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होते. अयोध्येतील राम मंदिर हे अंदाजे तीन वर्षांत बांधून पूर्ण होईल असे मंदिराचे संरचनाकार सांगत आहेत. पण त्याचदरम्यान, ऑल इंडिया इमाम असोसिएशनच्या अध्यक्षांनी एक चिथावणीखोर वक्तव्य केले आहे.

“मशीद ही कायम मशीदच असते असं इस्लाम सांगतं. मशीद पाडून त्या जागी काहीही दुसरं बांधता येत नाही. आम्हाला खात्री आहे की तिथे मशीद होती आणि कायम राहिल. मंदिर पाडून त्याजागी मशीद बांधण्यात आली नव्हती. पण आता कदाचित मशीद बांधण्यासाठी मंदिर पाडलं जाऊ शकतं”, अशी दर्पोक्ती ऑल इंडिया इमाम असोसिएशनचे अध्यक्ष साजीद रशीदी यांनी एएनआयशी बोलताना केली. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिर भूमिपूजनाच्या सोहळ्याला हजेरी लावून संविधानाचा अपमान केला असल्याचेही मत मौलानांनी मांडले.

राम मंदिर भूमिपूजनानंतर एमआयएमचे नेते आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनीही यावर नाराजी व्यक्त केली होती. भूमिपूजनात सहभागी होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या पदाचा अपमान केला असल्याची टीका त्यांनी केली होती. जिथे एकेकाळी मशीद उभी होती, तिथे मंदिराचं भूमिपूजन करणं हा लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेचा पराभव असून हिंदुत्त्वाचा विजय असल्याचं ओवेसी यांनी म्हटलं होतं.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा काल पार पडला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण देशाचं लक्ष या सोहळ्याकडे लागलं होतं. करोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. सरसंघचालक मोहन भागवत कार्यक्रमासाठी मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही सोहळ्यासाठा उपस्थित होते.