पतंजली आयुर्वेदचे संस्थापक योग गुरु बाबा रामदेव आणि त्यांचे सहकारी आचार्य बालकृष्ण आता तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही पाऊल टाकले आहे. त्यासाठी पतंजली आयुर्वेद समुहाद्वारे त्यांनी ‘भरुआ सोलुशन्स’ नावाची कंपनी स्थापन केली आहे. ही कंपनी वितरण साखळी व्यवस्थापन, वितरण, माती परिक्षण, फर्टिलायझर कॅल्क्युलेशन, बॅकवर्ड लिंकेज या क्षेत्रात काम करणार आहे.

पतंजली आयुर्वेदचे एमडी आचार्य बालकृष्ण म्हणाले, “भरुआ सोलुशन्सच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातूनच सध्या पतंजली आयुर्वेदची साखळी वितरण व्यवस्था चालवली जाते तसेच रिटेल बिलिंगचेही काम केले जाते. या स्टार्टअपमध्ये गेल्या एका वर्षात आत्तापर्यंत १०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. बिझनेस टुडेने याबाबत वृत्त दिले आहे.

या कंपनीच्या स्थापनेची गरज का भासली याबाबत सांगताना बालकृष्ण म्हणाले, “गरज ही शोधाची जननी असते. या न्यायाने आपण ज्यावेळी संकटात असतो त्याचवेळी त्यातून बाहेर पडण्यासाठीच्या उपायांवर काम करायला सुरुवात करतो. याच धर्तीवर आम्ही वितरण साखळीतील आव्हानांचा सामना करण्यासाठी हा प्रयत्न केला होता. त्यानंतर पतंजली आयुर्वेदने फास्ट मुव्हिंग कॉन्झुमर गुड्स (एफएमसीजी) क्षेत्रात धमाकेदार प्रवेश केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. पतंजलीने २०११ ते २०१७ या काळात १०,००० कोटींच्या महसूलाचे लक्ष्य साध्य केलं होतं. मात्र, २०१७-२०१८ मध्ये कंपनीच्या महसूलात घट होऊन तो ८,१३५ कोटींवर आल्याचेही त्यांनी सांगितले.

दिल्लीत आहे मुख्य कार्यालय

दरम्यान, ‘भरुआ सोल्युशन्स’च्या वेबसाईटनुसार या कंपनीचे कार्यालय दिल्लीच्या द्वारका भागातील सेक्टर ७ मध्ये आहे. ही कंपनी क्लाऊड बेस्ट सिस्टिम, अकाऊंटिंग, ह्युमन रिसोर्स, प्रमोशन अँड प्राईस मॅनेजमेंट आणि मॅन्युफॅक्चरिंग मॅनेजमेंटच्या क्षेत्रात काम करते.

जीएसटीमुळे पतंजलीच्या महसूलात घट

गेल्या काही वर्षांपासून पतंजली आयुर्वेद या कंपनीच्या महसूलात मोठी घट झाली आहे. याबाबत सांगताना आचार्य बाळकृष्ण म्हणाले, “जीएसटी लागू झाल्यानंतर टॅक्सेशनमध्ये गुंतागुंत निर्माण झाल्याने ही घट झाली आहे. याचा परिणाम आमच्या कंपनीवर झाला होता. मात्र, आम्ही लवकरच १०,००० कोटींचे लक्ष्य गाठण्यापर्यंत पोहोचू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.