योगगुरु रामदेव बाबा यांनी कुंभमेळ्यात सहभागी झालेल्या संत आणि साधूंना धुम्रपान सोडण्याचं आवाहन केलं आहे. ‘आपण राम आणि कृष्णाचे भक्त आहोत ज्यांनी त्यांच्या जीवनात कधीही धुम्रपान केलं नाही, मग तुम्ही का करता ? आपण धुम्रपान सोडणार अशी शपथ घेतली पाहिजे’, असं रामदेव बाबा यांनी म्हटलं आहे.

पुढे ते म्हणाले की, ‘आपण साधू आहोत…आपण सगळ्याचा त्याग केला आहे. एका मोठ्या कारणासाठी आपण घर, आई, वडील सगळ्यांना सोडलं आहे. पण मग धुम्रपान का सोडू शकत नाही’. रामदेव बाबा यांनी कुंभमेळ्यात असणाऱ्या अनेक साधूंकडून चिल्लम गोळा केली आणि आपण पुन्हा कधी तंबाखूला हात लावणार नाही अशी शपथ घेण्यास सांगितलं.

‘मी अनेक तरुणांना तंबाखू आणि धुम्रपानाचं व्यसन सोडायला लावलं आहे. मग महात्मांना का नाही सांगू शकत’, असंही रामदेव बाबा यांनी म्हटलं आहे. 55 दिवस चालणाऱा कुंभमेळा 4 मार्चला संपणार आहे.