राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ‘पांचजन्य’मध्ये प्रकाशित झालेल्या ‘त्या’ लेखापासून स्वतःला अलिप्त केल्याचे दिसून येत आहे. ज्या लेखामध्ये असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता की, “माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज इन्फोसिस लि.द्वारे हाताळल्या जाणाऱ्या भारताच्या कर-विवरण वेबसाइटवर झालेल्या तांत्रिक चुकांमागे “राष्ट्रविरोधी” षड्यंत्र असू शकते” यावर आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून भूमिका स्पष्ट करण्यात आलेली आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुनील आंबेकर यांनी याबाबत ट्विट केलं असून, लेखात व्यक्त करण्यात आलेले विचार संघटनचे नाही, तर लेखकाचे व्यक्तिगत विचार आहेत, असं सांगितले आहे.

“एक भारतीय कंपनी म्हणून, भारताच्या प्रगतीत इन्फोसिसचे महत्वपूर्ण योगदान आहे. इन्फोसिसद्वारे संचालित पोर्टलच्या संबंधी काही मुद्दे असू शकतात, मात्र पांचजन्यमध्ये या संदर्भात प्रकाशित लेख म्हणजे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत. पांचजन्य संघाचे मुखपत्र नाही.” असं सुनील आंबेकर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

तसेच, त्यांनी  हे देखील सांगितले की, यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला लेखातील विचारांशी जोडलं जाऊ नये.
मागील महिन्यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी इन्फोसिसचे सीईओ सलील पारेख यांच्या सोबत झालेल्या बैठकीत, कंपनीद्वारे निर्माण करण्यात आलेल्या नव्या आयकर पोर्टलमध्ये सातत्याने येत असलेल्या तांत्रिक अडचणींबाबत मोठी नाराजी व्यक्त केली आणि सर्व त्रुटी दूर करण्यासाठी त्यांना १५ सप्टेंबरपर्यंत वेळ दिला आहे.

‘इन्फोसिस’ची नक्षलवादी, देशद्रोह्यांना मदत!

सलग दोन दिवसांपर्यंत पोर्टल बंद राहिल्यानंतर इन्फोसिसच्या सीईओंना पाचारण करण्यात आले होते. अर्थमंत्र्यांनी वेबसाईट सुरू झाल्याच्या अडीच महिन्यानंतरही येत असलेल्या तांत्रिक अडचणींबद्दल सरकार आणि करदात्यांच्या समस्या अधोरेखित केल्या होत्या. सीतारामन यांनी करदात्यांना येत असलेल्या अडचणींबद्दल इन्फोसिसकडून स्पष्टीकरण मागितले होते.