News Flash

अस्वच्छतेवरून प्रसाद यांनी फटकारले

कार्यालयात सर्वत्र पडलेले पत्रांचे खच आणि त्याबाजूला असलेले कचऱ्याचे ढीग पाहून दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांचा पारा सोमवारी चढला आणि सरकारी कार्यालयातील अस्वच्छतेबद्दल टपाल अधिकाऱ्यांचे

| September 30, 2014 12:45 pm

कार्यालयात सर्वत्र पडलेले पत्रांचे खच आणि त्याबाजूला असलेले कचऱ्याचे ढीग पाहून दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांचा पारा सोमवारी चढला आणि सरकारी कार्यालयातील अस्वच्छतेबद्दल टपाल अधिकाऱ्यांचे कान पिळले. सर्वानी स्वच्छता पाळलीच पाहिजे, त्यासाठी सर्वच पातळीवरील जबाबदार व्यक्तीने गंभीर असायला हवे, अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूचना करूनही कोणत्याही अधिकारी अथवा कर्मचाऱ्याचे टेबल स्वच्छ नाही. शिवाय कार्यालयात कचऱ्याचे ढीग पडले आहेत. त्यामुळे माझा तुम्हाला आदेश आहे की, देशातील प्रत्येक टपाल कार्यालय स्वच्छ आणि नीटनेटके असायला हवे, हे ध्यानात घ्या, असे त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना बजावले. गोल टपाल कार्यालय आणि लोधी रोड टपाल कार्यालयाला सोमवारी प्रसाद यांनी अचानक भेट दिली. त्यामुळे अधिकाऱ्यांची एकच तारांबळ उडाली. प्रसाद यांनी कार्यालयातील अनेक कक्षांची आणि कपाटांची पाहणी केली. त्यावेळी त्यांना जागोजागी धूळ आणि कागदांचे कपटे जागोजागी पडल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांचा पारा चढला. पंतप्रधानांची ‘स्वच्छ भारत मोहीम’ यशस्वी करण्यासाठी कृती आराखडा हाती घेण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना या वेळी केल्या.
‘स्वच्छतेसाठी कर्मचाऱ्यांना कामाला लावा’
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी ‘स्वच्छ भारत’ योजनेस सहभागी होण्यासाठी सर्व राज्य सरकारांनी आपल्या कर्मचाऱ्यांना प्रवृत्त करावे, अशा सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत.पंतप्रधानांच्या कार्यालयातून याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाच्या सचिवांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना याबाबत सूचना दिल्या असून, कर्मचाऱ्यांना प्रवृत्त करण्यास सांगितले आहे, असे कार्मिक विभागाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी सांगितले.जितेंद्र सिंग यांनी सोमवारी स्वत: आपल्या कार्यालयाच्या सहा क्रमांकाच्या प्रवेशद्वारावर स्वच्छ भारत मोहिमेत सहभाग घेतला. येत्या २ ऑक्टोबर रोजी केंद्र सरकारचे सर्व कर्मचारी स्वच्छतेची शपथ घेणार आहेत आणि हीच मार्गदर्शक तत्त्वे सर्व राज्यांना पाठविण्यात आली आहेत, असेही ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 30, 2014 12:45 pm

Web Title: ravi shankar prasad inspects post office as part of cleanliness drive
टॅग : Ravi Shankar Prasad
Next Stories
1 तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून पन्नीरसेल्वम यांचा शपथविधी
2 गुणपत्रिका, जन्मदाखला आदींवर आता स्वत:ची सही चालणार
3 बडोदा शांत; पण अद्याप तणावग्रस्त
Just Now!
X