आग्रा येथे अलीकडेच घडवून आणलेले मुस्लीम धर्मीयांचे सामूहिक धर्मातर ही ‘लबाडीचे काम आणि संशयास्पद कृती’ असून श्रद्धा बदलण्याच्या गांभीर्ययुक्त कार्यवाहीशी त्याचा काहीही संबंध नाही, असे उत्तर प्रदेशच्या अल्पसंख्याक आयोगाने म्हटले आहे.
मुफ्ती झुल्फिकार अली, शफी आझमी, सुहैल अय्युब जिंजारी आणि नफीसुल हसन या चार सदस्यांचा समावेश असलेल्या अल्पसंख्याक आयोगाने काल आग्य्राला भेट दिल्यानंतर येथे पत्रकारांशी बोलताना सामूहिक धर्मातराबाबत आपले मत व्यक्त केले. आग्य्रातील हिंदू नागरिक आणि जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या भूमिकेची त्यांनी प्रशंसा केली.
ज्या वेदनगर वस्तीत हा कथित धर्मातरणाचा कार्यक्रम झाला, तेथील हिंदू रहिवासी दूरदृष्टी आणि माणुसकीच्या तत्त्वांनुसार वागले नसते, तर परिस्थितीला वाईट वळण लागले असते असे आम्ही नि:संकोचपणे सांगू शकतो, असे नमूद करतानाच वाल्मीकी समाज आणि आग्य्रातील हिंदू समाजाच्या प्रमुख नेत्यांनी बजावलेल्या भूमिकेची आयोगाने प्रशंसा केली.
रा.स्व. संघाशी संबंधित असलेल्या धर्मजागरण सभेने ८ डिसेंबर रोजी एका कार्यक्रमात आग्य्राच्या ३७ कुटुंबांतील किमान १०० जणांना हिंदू धर्मात परत घेतले होते. याबाबत आग्य्रातील हिंदू समाजाच्या प्रमुख नेत्यांशी आम्ही चर्चा केली, तेव्हा ते अशा धर्मातराला मान्यता देत नसल्याबाबत आमची खात्री पटली. अशा संशयास्पद प्रकाराने झालेले धर्मातर हिंदू समाजाच्या हिताचे नाही, असे त्यांचे मत असल्याचे आयोगाचे सदस्य म्हणाले.