सध्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशभरातील सरकारी आणि खासगी बँकांमध्ये नागरिकांकडून पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटा मोठ्याप्रमाणावर जमा केल्या जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबरला या नोटा चलनातून रद्द करण्याची घोषणा केली होती. आता या नोटा बँकेतून बदलून घेण्यासाठी ३० डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेतील एकूण चलनी नोटांपैकी ८६ टक्के नोटा रद्दबादल ठरणार आहेत. या नोटांची जागा आता ५०० आणि २००० रूपयांच्या नवी सुरक्षा वैशिष्ट्ये असलेल्या नोटा घेणार आहे. मात्र, नव्या नोटा चलनात आल्यानंतर सरकार जुन्या नोटांचे काय करणार, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. जाणून घेऊया जुन्या नोटांबाबतच्या या पाच रंजक गोष्टी.

* ब्लुमबर्गच्या माहितीनुसार सरकारने नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर देशभरातील बँकांमध्ये ५०० आणि १००० रूपयांच्या तब्बल २३०० कोटी नोटा जमा होतील.

* ५०० आणि १००० रूपयांच्या या नोटा एकावर एक रचल्यास या नोटांच्या ढीगाची उंची माऊंट एव्हरेस्ट या जगातील सर्वात उंच पर्वत शिखराच्या तिप्पट भरेल. माऊंट एव्हरेस्टची समुद्रसपाटीपासूनची उंची ८,८४८ मीटर इतकी आहे.

* रिझर्व्ह बँकेकडून जुन्या पाचशे आणि हजाराच्या नोटांचे काय केले जाणार, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. रिझर्व्ह बँकेतील काही अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या जुन्या नोटा एकतर पुरून टाकल्या जातील किंवा औद्योगिक वापरासाठी लागणारे उत्पादन तयार करण्यासाठी या नोटांचा वापर करण्यात येईल.

* नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर बँकांमध्ये पाचशे आणि हजाराच्या साधारण १५ लाख कोटी किंमतीच्या नोटा जमा होतील, असा दावा मोदी सरकारने केला होता. सध्या या नोटा बँकांमध्ये जमा करण्याची प्रक्रिया सुरू असून आतापर्यंत तब्बल ६ लाख कोटी रूपये बँक खात्यांमध्ये जमा झाल्याचा अंदाज आहे. मात्र, यापैकी ५ लाख कोटी रूपये कायदेशीर भीतीच्या कारवाईने बँकांमध्ये जमाच केले जाणार नाहीत, असे सांगितले जात आहे.

* ब्लुमबर्गच्या माहितीनुसार जगभरात नोट निर्मिती व्यवसायाची तब्बल २७०० कोटी डॉलर्सची बाजारपेठ आहे. यामध्ये आशियाई देश पहिल्या, युरोप दुसऱ्या आणि आफ्रिका व मध्यपूर्वेचे देश तिसऱ्या क्रमांकावर आहेत. या जागतिक बाजारपेठेत एकट्या भारताचा वाटा १.५ टक्के इतका आहे. रिझर्व्ह बँक प्रत्येक वर्षाला चलन छापण्यासाठी ४० कोटी रूपये खर्च करते.