परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची पाकिस्तानकडे पुन्हा मागणी

 नवी दिल्ली : हेरगिरीच्या आरोपाखाली निवृत्त नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने केलेली अटक बेकायदा आहे. त्यामुळे पाकिस्तानने जाधव यांची तातडीने मुक्तता करावी आणि त्यांना भारताच्या ताब्यात द्यावे, अशी फेरमागणी केंद्रीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी केली आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये त्यांनी याबाबत निवेदनद्वारे  माहिती दिली.

कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानी न्यायालयाने ठोठावलेल्या फाशीचा पुनर्विचार करावा, असा निकाल द हेगमधील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिला आहे. जाधव यांची बाजू न ऐकता पक्षपाती निकाल दिल्याचा आरोप भारताने केला होता. याच संदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली होती. जाधव यांची बाजू मांडण्याची संधी दिली गेली नाही, हा मुद्दा आंतरराष्ट्रीय न्यायालयाने मान्य केला. त्याचा संदर्भ देत परराष्ट्रमंत्री जयशंकर म्हणाले की, आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निकाल फक्त भारतासाठीच नव्हे तर कायद्याच्या राज्यावर विश्वास असणाऱ्या सर्व देशांना दिलासा देणारा आहे.

अत्यंत कठीण परिस्थितीत कुलभूषण यांच्या कुटुंबाने दाखवलेले धैर्य अतुलनीय आहे. जाधव यांची सुटका करून त्यांना भारतात परत आणण्यासाठी केंद्र सरकारतर्फे सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे जयशंकर म्हणाले. दहशतवाद आणि हेरगिरी या दोन अत्यंत गंभीर आरोपाखाली कुलभूषण यांना बलुचिस्तानमध्ये मार्च २०१६ मध्ये अटक करण्यात आले होते. त्यांना २०१७ मध्ये पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. मात्र, बुधवारी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने १५  विरुद्ध १ मतांनी फाशीला स्थगिती दिली. पाकिस्तान वगळता अन्य देशांच्या सदस्यांनी भारताच्या बाजूने निकाल दिला.

राज्यसभेत सभापती व्यंकय्या नायडू यांनी केंद्र सरकारच्या प्रयत्नांचे तसेच, देशासाठी नाममात्र एक रुपयांचे शुल्क घेऊन खटला चालवल्याबद्दल ज्येष्ठ वकील हरीश साळवी यांचेही कौतुक केले.