छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह््यात अलीकडेच झालेल्या चकमकीनंतर नक्षलवाद्यांनी अपहरण केलेल्या एका ‘कोब्रा’ कमांडोची गुरुवारी सुटका करण्यात आल्याचे अधिकृत सूत्रांनी गुरुवारी सांगितले.

कमांडो बटालियन फॉर रिझॉल्युट अ‍ॅक्शनचा (कोब्रा) चा सिपाई राकेश्वार सिंह मन्हास याचे नक्षलवाद्यांनी अपहरण केले होते. त्याची सुटका सुनिश्चित करण्यासाठी राज्य सरकारने आदिवासी समुदायातील एका जणासह दोन ख्यातनाम व्यक्तींना नेमले होते. या दोघांच्या नक्षलवाद्यांशी झालेल्या चर्चेनंतर मन्हास याची सुटका करण्यात आली.

जम्मूचा रहिवासी असलेल्या या जवानाला बिजापूर स्थित केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताडेम तळावर आणण्यात येणार असल्याचे या दलाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

बिजापूर- सुकमा जिल्ह््यांच्या सीमेवर ३ एप्रिलला झालेल्या भीषण चकमकीत सुरक्षा दलांचे २२ जवान शहीद, तर ३१ जण जखमी झाले होते.