गेल्या वर्षभरापासून नापाक पाकिस्तानच्या कुरापती वाढल्या आहेत. सीमेवर वारंवार पाकिस्तान सैन्याकडून होणाऱ्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनामुळे सीमेवर तणावाचे वातावरण आहे आणि पाकिस्तानच्या याच कुरापतीमुळे सीमा सुरक्षादलानं यंदा पाकिस्तानी रेन्जर्सनां मिठाई दिली नाही. स्वांतत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन , दिवाळी किंवा महत्त्वाच्या दिवशी दोन्ही सीमा दलाकडून मिठाईची देवाणघेवाण होते मात्र यावेळी दोन्ही देशांतील सीमेवर तणावाचं वातावरण असल्यानं मिठाईची देवाणघेवाण करण्याच्या परंपरेत खंड पडला आहे.

असं असलं तरी भारतीय सैन्यानं बांगलादेशमधील सुरक्षादलाच्या जवानांना प्रजासत्ताक दिनानिमत्तानं मिठाई दिली आहे. भारत आणि पाकिस्तानं या दोन्ही देशातील संबध हे शत्रुत्त्वाचे असले तरी महत्त्वाच्या दिवशी दोन्ही देशांतील सुरक्षा दल मिठाईची देवाणघेवाण करतात. पण, जर सीमेवर तणावाचे वातावरण असेल तर मात्र या परंपरेत खंड पडतो. गेल्या वर्षभरात पाकिस्ताकडून ८००हून अधिकवेळा शस्त्रसंधींचं उल्लंघन झालं होतं. काश्मीर खोऱ्यात मागील तीन वर्षांत दहशतवादी हल्ल्यात १९५ सुरक्षा कर्मचारी शहीद झाले आहेत. वर्ष २०१७ मध्ये ७८, वर्ष २०१६ मध्ये ७४ आणि वर्ष २०१५ मध्ये ४३ सुरक्षा कर्मचारी शहीद झाले. त्यामुळे मिठाईची देवाण घेवाण न करण्याचा निर्णय सीमा सुरक्षा दलानं घेतला.