मेलबर्न : ऑस्ट्रेलियातील परदेशी पत्रकारांवर आता संघराज्य संस्थांकडून देखरेख केली जाणार असून त्यांनी जर देशाची चुकीची प्रतिमा रंगवली व देशातील लोकशाही राज्यव्यवस्थेत हस्तक्षेप करून बौद्धिक संपदा हक्क चोरण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.

चीनशी सुरू असलेल्या वादामुळे ऑस्ट्रेलियाने हा निर्णय घेतला आहे. चीनने अनेक देशातील संस्थांमध्ये त्यांचे हस्तक पाठवून बरीच माहिती चोरल्याचे ऑस्ट्रेलियातील एका संस्थेच्या अहवालात उघड झाले आहे.

ऑस्ट्रेलियाचे गृह कामकाज मंत्री पीटर डय़ुटन यांनी सांगितले, की ऑस्ट्रेलियातील संघराज्य पोलिस विभाग व परराष्ट्र विभाग हे आता सरकारच्या इतर विभागांशी सहकार्य करतील. ऑस्ट्रेलियातील परदेशी हस्तक्षेपावर लक्ष ठेवण्याचे काम आता गांभीर्याने केले जाणार आहे. जर येथे काही परदेशी पत्रकार चुकीच्या पक्षपाती बातम्या देत असतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. ऑस्ट्रेलियन कायद्याच्या हिताविरोधात काम करणारे परदेशी पत्रकार व उद्योगपती यांच्यावर कारवाई केली जाईल. हेरगिरीच्या कारवाया कुणी केल्या तर तो एक मोठा प्रश्न आहे. ऑस्ट्रेलियात येणाऱ्या परदेशी पत्रकारांची छाननी केली जाईल.

ऑस्ट्रेलियाच्या दोन पत्रकारांवर चीनने कारवाई करून त्यांना मायदेशी हाकलून दिले होते. या पत्रकारांचे चीनने जाबजबाब घेतले होते. बिल बिर्टल्स व माइक स्मिथ अशी त्यांची नावे असून त्यांनी चीनमधील कायदेशीर कामात अडथळा आणल्याचा आरोप  करण्यात आला होता.

ऑस्ट्रेलियाच्या एको पत्रकारास चेंग लेई प्रकरणात ऑगस्टमध्ये चीनच्या गुप्त छळछावणीत टाकण्यात आले होते.

चीनच्या या कृतीला प्रतिसाद म्हणून ऑस्ट्रेलियानेही परदेशी पत्रकारांवर देखरेखीचा बडगा उगारला  आहे. लेई नावाच्या ऑस्ट्रेलियाच्या एका पत्रकारास चीनने ताब्यात घेतले आहे, त्याचे काय झाले  हे  पुढे काहीच समजलेले नाही.