पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्याप्रकरणी केंद्रातील मोदी सरकारवर चारही बाजूने हल्लाबोल होताना दिसत आहे. नीरव मोदी-पीएनबीप्रकरणी विरोधी पक्षांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. यात आता लालूप्रसाद यादव यांनीही उडी घेतली आहे. चारा घोटाळ्याप्रकरणी तुरूंगात शिक्षा भोगत असलेले राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) सर्वेसर्वा लालूप्रसाद यांनी मंगळवारी पीएनबीप्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरच थेट निशाणा साधला. पंतप्रधान मोदींच्याच भाषणाच्या अंदाजात त्यांनी कोणाचे नाव न घेता केंद्र सरकार आणि नरेंद्र मोदी यांना याप्रकरणी आरोपी ठरवत एक ट्विट केले आहे. बंधू आणि भगिनीनों, जर आपल्या घराचा चौकीदार लुटारूंच्या मदतीने आपल्याच घरी चोरी करत असेल तर त्याला बदलले पाहिजे की नाही ? सांगा त्याला बदलायला हवे की नाही ? सांगा मित्रों, असे ट्विट करत मोदींना टोला लगावला.

लालूंनी यापूर्वी सोमवारीही पीएनबी घोटाळा आणि पकोडे विकण्याच्या सल्ल्यावरून मोदींवर टीकास्त्र सोडले होते. पकौडा लोन लेकर, थपौडा मार मोदी विदेश भागम भाग, असे ट्विट केले होते.

सध्या लालूंचा रांचीतील एका तुरूंगात मुक्काम आहे. तुरूंगात जाण्यापूर्वी त्यांनी आपल्या समर्थक आणि बिहारमधील लोकांना यापुढेही ट्विटवर संदेश देत राहणार असल्याचे सांगितले होते. त्यांनी आपले ट्विटर खाते कार्यालय आणि कुटुंबातील लोक चालवणार असल्याचे म्हटले होते. मला जे काही सांगायचे आहे, ते या माध्यमातून सांगेन असे त्यांनी म्हटले होते. तुरूंगात गेल्यापासून लालू ट्विटरच्या माध्यमातूनच आपल्या विरोधकांना लक्ष्य करत आहेत.