इराण-अमेरिकेतील वादामुळे मध्य पूर्व आशियात तणाव निर्माण झालेला असताना इराकमधील लष्कराच्या तळावर पुन्हा एकदा रॉकेट झाला आहे. ताजी लष्कारी तळावर रॉकेट डागण्यात आले असून यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या हल्ल्याची अद्याप कुणीही जबाबदारी घेतलेली नाही. दोन दिवसांपूर्वीच बगदादपासून साधारण ७० किलोमीटर उत्तरेस स्थित असलेल्या अल-बलाद हवाईतळावर आठ रॉकेट सोडण्यात आले होते.

इराकची राजधानी बगदादपासून उत्तरेस ८५ किमी अंतरावर असलेल्या ताजी लष्करी तळावर मंगळवारी दोन रॉकेट हल्ले करण्यात आले. कत्युशा रॉकेटनं या तळाला निशाणा बनवण्यात आलं. या परिसरात अमेरिकी सैन्यातील जवानांसह इतर देशातील जवानांच्या निवासस्थानं आहेत. मात्र, या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं ‘अलजजिरा’नं म्हटलं आहे.

वादाची ठिणगी केव्हा पडली?

इराण अमेरिकेतील वैर नवं नाही. मात्र, इराकचे टॉप कमांडर असलेल्या मेजर जनरल कासिम सुलेमानीची अमेरिकेनं हत्या केली आणि दोन्ही देश पुन्हा आमनेसामने आले. बगदादमध्ये सुलेमानीवर हवाई हल्ला करण्यात आला. त्यानंतर खवळलेल्या इराणनं इराकमध्ये असलेल्या अमेरिकी लष्करावर हल्ले केले. सुलेमानीच्या हत्येनंतर इराणनं प्रत्युत्तरात इराकच्या लष्करी तळांवर क्षेपणास्त्र हल्ला केला होता. यात अमेरिकेचे ८० सैनिक मारल्याचा दावा इराणनं केला होता. मात्र, अमेरिकेनं हा फेटाळून लावला होता. इराणनं केलेल्या हल्ल्यात एकाही जवानाला हानी झाली नसल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं होतं. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीही कत्युशा श्रेणीतील आठ रॉकेट इराकच्या लष्करी तळावर डागण्यात आले. यात इराकच्या लष्कराचे दोन अधिकारी आणि दोन जवान गंभीर जखमी झाले होते.