राजस्थानमधील जयपूर येथे २२ लाखांच्या सुपरबाईकवरून जाणाऱ्या एका तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली. रोहित सिंग शेखावत असे ३० वर्षीय तरुणाचे नाव आहे. एनएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार अपघातानंतर हेल्मेट काढता न आल्याने ब्रेनहॅमरेजमुळे रोहितचा मृत्यू झाला.

एका ऑटोबोमाबाईल कंपनीमध्ये सेल्स मॅनेजर पदावर कामाला असणाऱ्या रोहितचा गुरुवारी रात्री उशीरा अपघात झाला. ३०० किलोमीटर प्रतितास वेगाने धावू शकणाऱ्या २२ लाखांच्या सुपरबाईकवरून जाताना त्याचा अपघात झाला. शहरातील जेएलएन मार्गावरून जाताना रस्ता ओलांडणाऱ्या दोन लोकांना वाचवण्याच्या प्रयत्नात रोहितचे नियंत्रण सुटले. त्याने दोघांपैकी एकाला जोरदार धडक दिली आणि त्याची बाईक घसरली. ५० फुटांपर्यंत तो बाईकबरोबर घसरत गेल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर लगेचेच आजूबाजूला जमलेल्या लोकांनी रोहितला मोकळा श्वास घेता यावा म्हणून त्याचे हेल्मेट काढण्याचा प्रयत्न केला मात्र ते हेल्मेट काही केल्या निघत नव्हते. त्यांनी लगेचच रोहितला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनाही हेल्मेट कापूनच काढावे लागले. काही वेसबाईट्सने दिलेल्या माहितीनुसार रोहितने घातलेले हेल्मेट हे परदेशी बनावटीचे होते. ५० हजार रुपयांपर्यंत किंमत असणाऱ्या या हेल्मेटची रचना विशेष पद्धतीने केलेली असते. सुपरबाईक्सवरून वेगाने जाताना वाऱ्याचा सामना करता यावा तसेच वेगात असताना हेल्मेट डोक्यावर स्थिर राहावे, यासाठी हेल्मेटमध्ये विशेष पद्धतीच्या लॉक सिस्टीम असते. त्यामुळेच कदाचित रोहितचे हेल्मेट काढण्यासाठी वेळ लागल्याचे सांगितले जाते.

रोहितने ज्या व्यक्तीला धडक दिली त्याचीही प्रकृती चिंताजनक आहे. एनएआयने ट्विट केलेल्या अपघातग्रस्त बाईकच्या फोटोवरून अपघाताची तीव्रता लक्षात येते. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंदवून घेतला असून पुढील तपास सुरु असल्याचे वृत्त एनएआयने दिले आहे.