मिझोरमममधील एका मंत्र्याने सर्वाधिक आपत्य असणाऱ्या पालकांना एक लाख रुपयांची रोख रक्कम बक्षीस म्हणून जाहीर केली आहे. सर्वाधिक मुलं असणाऱ्या पालकांना हे बक्षीस देण्यामागील हेतू हा मिझो समाजाची लोकसंख्या वाढावी असा आहे. बक्षीसासाठी पात्र ठरणारे पालक हे या नेत्याच्या मतदारसंघामधील असावेत अशी अट घालण्यात आली आहे.

मिझोरमचे क्रीडा मंत्री रॉबर्ट रोमाविया रोयटे यांनी ही बक्षीस योजना सुरु केली आहे. मात्र ही घोषणा करताना किती मुलं असणाऱ्यांना गृहित धरलं जाणार आणि कोणाला नाही याबद्दलची माहिती देण्यात आलेली नाही. एकीकडे देशातील अनेक राज्यांमध्ये लोकसंख्या नियंत्रणासंदर्भातील कायद्याची मागणी केली जात असतानाच मिझोरममध्ये अशी घोषणा करण्यात आलीय.

रविवारी पार पडलेल्या फादर्स डेनिमित्त बोलताना रोयटे यांनी आपल्या मतदारसंघासाठी ही योजना जाहीर केली. सर्वाधिक आपत्य असणाऱ्या पालकांना आपण एक लाख रुपये रोख बक्षीस देणार आहोत, असं रोयटे यांनी सांगितलं. ही योजना फक्त अझवल पूर्व-२ या रोयटे यांच्या मतदारसंघापुरती लागू असेल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. तसेच बक्षीसास पात्र असणाऱ्या व्यक्तीला प्रमाणपत्र आणि ट्रॉफी सुद्धा दिली जाणार असल्याचं रोयटे यांनी सोमवारी जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

नक्की वाचा >> करोना : ‘या’ देशातील प्रत्येक नागरिकाला मिळाली लस; ठरला लसीकरण पूर्ण करणारा जगातील पहिलाच देश

हे बक्षिस रोयटे यांच्या मुलाची बांधकाम क्षेत्रातील कंपनीकडून दिलं जाणार असल्याची माहिती एनडीटीव्हीने दिली आहे. मिझो समाजाची लोकसंख्या कमी होत असून ही चिंतेची बाब आहे असंही रोयटे म्हणाले. “मिझोरममधील लोकसंख्या कमी असल्याने येथील लोकांची अनेक क्षेत्रामध्ये प्रगती झालेली नाही. कमी लोकसंख्या ही मिझो समाजासारख्या छोट्या घटकांसमोरील मोठी अडचण असते. समाजात स्थान टिकून राहण्यासाठी आणि प्रगती करण्यासाठी कमी लोकसंख्या हा अशा छोट्या गटांना मोठा अडथळा ठरतो,” असं रोयटे यांनी म्हटलं आहे.

मिझोरममध्ये मिझो आदीवासी समाजातील अनेक जमाती वास्तव्यास आहे. काही चर्च आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून मिझो समाजातील लोकसंख्या राज्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात टिकून राहील यासाठी प्रयत्न करत असल्याचं रोयटे म्हणालेतच.

२०११ च्या जणगणनेनुसार मिझोरमची लोकसंख्या १० लाख ९१ हजार १४ इतकी होती. राज्याचे आकारमान हे २१ हजार ८७ चौरस किमी इतकं आहे. म्हणजेच प्रत्येक चौरस किमीमध्ये केवळ ५२ लोक राहतात. अरुणाचल प्रदेशनंतर सर्वात कमी लोकसंख्या घनता असणारं मिझोरम हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे. अरुणाचलमध्ये एका चौरस किमीमध्ये केवळ १७ लोक राहतात. देशामधील लोकसंख्येची सरासरी घनता ३८२ प्रती चौरस किमी इतकी आहे.

मात्र दुसरीकडे मिझोरमच्या शेजारी असणाऱ्या आसामने वेगळं धोरण स्वीकरलं आहे. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिसवा सरमा यांनी सरकार हळूहळू दोन मुलांसंदर्भातील धोरण लागू करणार असून दोन मुलं असणाऱ्यांना काही विशेष सरकारी योजनांचा लाभ मिळणार आहे. २०१९ साली आसाम सरकारने नवीन नियम तयार केला होता. यानुसार दोनपेक्षा अधिक मुलं असणाऱ्यांना जानेवारी २०२१ पासून सरकारी नोकरी देण्यात येणार नाही. पंचायत निवडणुकांपासून सर्वच निवडणुकांच्या पात्रतेसाठी आता राज्यात दोन मुलांचं धोरण लागू करण्यात आलं आहे.