टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्याविरोधात टाटा ट्रस्टचे व्यवस्थापकीय विश्वस्त व्यंकटरमणन् रामचंद्रन यांनी केलेला ५०० कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा महानगरदंडाधिकाऱ्यांनी मंगळवारी दाखल करून घेत मिस्त्री, त्यांचे बंधू शापूर मिस्त्री आणि त्यांच्या कंपनीच्या संचालकांविरोधात नोटीस बजावली आहे. त्यामुळे मिस्त्री यांना न्यायालयात हजर राहून जामीन घ्यावा लागणार आहे.

मिस्त्री बंधुंसह सायरस मिस्त्री इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि स्टर्लिग इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांना या फौजदारी दाव्यात प्रतिवादी करण्यात आले आहे. मिस्त्री आणि अन्य प्रतिवाद्यांनी आपल्यावर खोटे आरोप करत आपली प्रतिमा मलीन केल्याचा आरोप व्यंकटरमणन् यांनी केला आहे. त्यांच्या तक्रारीची दखल घेत महानगरदंडाधिकाऱ्यांनी मिस्त्री आणि त्यांच्या कंपनीविरोधात नोटीस बजावली. मिस्त्री बंधुकडे दिलासा मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात जाण्याचा पर्याय उपलब्ध आहे.

मिस्त्री यांनी २५ ऑक्टोबर २०१६ रोजी टाटा सन्सचे संस्थापक आणि टाटा ट्रस्टच्या विश्वस्तांना एक ई-मेल संदेश पाठवला होता. या संदेशात मिस्त्री यांनी माझी प्रतिमा मलीन केल्याचा दावा व्यंकटरमणन् यांनी केला आहे. तसेच मिस्त्री यांनी कंपनी लवादाकडे दाखल केलेल्या याचिकेत माझ्याविरोधात खोटे आणि निराधार आरोप केल्याचा त्यांचा दावा आहे. कंपनी सुशासनावरून सायरस मिस्त्री व रतन टाटा यांच्यात मतभेद झाल्यानंतर मिस्त्री यांची गेल्या वर्षी २४ ऑक्टोबर रोजी समुहाच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. फेब्रुवारी महिन्यात एन. चंद्रशेखरन यांची टाटा समुहाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.