डॉलरच्या तुलनेत रूपयाची घसरण सुरूच आहे. गुरूवारी रूपयांत २१ पैशांची घसरण होऊन तो डॉलरच्या तुलनेत आतापर्यंतच्या ६८.९५ या ऐतिहासिक नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. क्रूड ऑईलच्या किंमती आणि त्यामुळे जागतिक बाजारपेठेतील घडामोडीचा रूपयावर परिणाम होताना दिसतोय. दिवसभरातल्या उलाढालीत रुपयाने ६९ ची पातळी ओलांडली होती, मात्र बाजार बंद होताना तो या पातळीच्या जेमतेम खाली स्थिरावला. यापूर्वी पाचवर्षांपूर्वी म्हणजे २८ ऑगस्ट २०१३ रोजी रूपया ६८.८० पर्यंत आला होता.

दिवसभरात रूपयाने ६९ ची पातळी ओलांडली होती. कच्च्या तेलाचे भाव वाढल्याने गुंतवणूकदारांनी भांडवल बाजारातून पैसे काढण्यास सुरूवात केल्याचा फटका रूपयाला बसला. बुधवारी रूपया ६८.८१ रूपयांवर बंद झाला होता. पण आज बाजार सुरू होताच रूपयात पुन्हा एकदा घसरण पाहायला मिळाली. ज्या पद्धतीने रूपयाची घसरण सुरू झाली. ती पाहता रूपया विक्रमी ६९ रूपयांच्या निचांकी स्तरावर जाईल अशी शक्यता होती. परंतु, अखेरच्या टप्प्यात यात थोडीफार सुधारणा झाली.