गोव्यातील ४५ व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवात रशियाचे दिग्दर्शक आंद्रे झ्वागिनेत्सेव यांच्या ‘लेवियाथन’ या चित्रपटाला ‘सुवर्णमयूर’ पुरस्कार मिळाला आहे. मराठी चित्रपट ‘एक हजाराची नोट’ या चित्रपटाने शतकी (सेंटनरी) पुरस्कार पटकावला आहे. ‘एक हजाराची नोट’ हा चित्रपट विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर आधारित असून त्याला परीक्षकांचा विशेष पुरस्कार व शतकी म्हणजे सेंटेनरी पुरस्कार मिळाला आहे. श्रीहरी साठे यांनी प्रथमच दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाला हा सन्मान मिळाला आहे.
‘लेवियाथन’ या चित्रपटात अ‍ॅलेक्सेल सेरेब्रायाकोव यांना उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार ‘छोटोदेर छोबी’ या चित्रपटातील कलाकार दुलाल सरकार यांच्या समवेत मिळाला आहे. माहिती व प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झाले. उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार क्युबाची अरिना रॉड्रिग्युझ हिला क्युबन स्पॅनिश चित्रपट ‘बिहॅवियर’ साठी, तर इस्रायली अभिनेत्री सरित लॅरी हिला ‘द किंडरगार्टन टीचर’ या चित्रपटासाठी विभागून मिळाला. उत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार ‘द किंडरगार्टन टीचर’ चे दिग्दर्शक नदाफ लॅपीड यांना मिळाला आहे. त्यांचा ‘एमिलीज गर्लफ्रेंड’ हा चित्रपट यापूर्वी गाजला होता. जीवनगौरव पुरस्कार हाँगकाँगचे चित्रपट निर्माते वाँग कार-वाई यांना मिळाला आहे, त्यांचे ‘इन द मूड फॉर लव्ह’, ‘अ‍ॅशेस ऑफ टाइम’ व ‘चुंगकिंग एक्सप्रेस’ हे चित्रपट गाजले.